Pro Kabaddi League 2024 : रोमहर्षक सामन्यात पायरेट्सकडून थलैवाज पराभूत…

Pro Kabaddi League 2024 (Patna Pirates vs Tamil Thalaivas) :- आज 25 ऑक्टोबरला पटना पायरेट्स आणि तमिळ थलैवाज यांच्यात चुरशीचा सामना पाहायला मिळाला. रेडर देवांगच्या दमदार खेळाच्या जोरावर पाटणा पायरेट्स संघाने तमिळ थलैवाज संघाला केवळ 2 गुणांनी पराभूत करताना 11 व्या प्रो कबड्डी लीगमध्ये या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. एकवेळ पटना संघ सामन्यात 11 गुणांनी पिछाडीवर होता पण त्यानंतर त्यांनी उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करत सामना जिंकला.
Panna paltenge they said, did it quite literally 💚
Get LIVE match updates on https://t.co/cfORnV9MAP or the Pro Kabaddi Official App 📱#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PatnaPirates #TamilThalaivas pic.twitter.com/OL0MIm5yrF
— ProKabaddi (@ProKabaddi) October 25, 2024
गचीबोवली स्टेडियममध्ये झालेल्या आजच्या अतितटीच्या लढतीत पाटणा संघाने तमिळ थलैवाज संघाला 42-40 असे केवळ 2 गुणांनी मात दिली. पायरेट्स संघाचा रेडर देवांगने आजच्या लढतीत चढाईतून 17 तर बोनसमधून 8 अशा एकूण 25 गुणांची कमाई केली. त्याला अंकितने 4 पकडी करताना सुरेख साथ दिली. दुसऱ्या बाजूने नरेंदर कांडोलाने देखील दमदार खेळ केला. त्याने पकडीतून 8 तर बोनसमधून 7 अशी 15 गुणांची कमाई करताना सुपर टेन पूर्ण केले. त्याला सचिनने 6, नितेश कुमारने 4 गुण मिळविताना सुरेख साथ दिली.
मध्यंतराला थलैवाज संघाने 23-18 अशी आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात थलैवाजने चढाईतून 11 तर पकडीतून 9 गुणांची कमाई केली. याचबरोबरीने लोण चढविताना 2 गुण वसूल केले. पायरेट्स पहिल्या सत्रात पिछाडीवर होती. पायरेट्स संघाने चढाईतून 13 तर पकडीतून केवळ 2 गुण मिळविले.
दुसऱ्या सत्रात मात्र पायरेट्सने आपला खेळ उंचावला. दुसऱ्या सत्रात पायरेट्सने 24 तर थलैवाज संघाने 17 गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात पायरेट्सने चढाईतून 14 तर पकडीतून 7 गुण मिळविले. मात्र थलैवाज संघाला चढाईतून 10 तर पकडीतून 5 गुण मिळविता आहे.





