पाचव्या मजल्यावरून उडी मारून रुग्णाची आत्महत्या; नागपूर एम्समधील धक्कादायक घटना

नागपूर – ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये (एम्स) एका रुग्णाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. एम्समध्ये आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. एम्स प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. नामदेव मोहोड (वय-७१) असे रुग्णाचे नाव असून, ते मांगली गावचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांगली येथील रहिवासी नामदेव लहानू मोहोड यांना काही दिवसांपूर्वी नातेवाईकांनी एम्समध्ये दाखल केले होते. त्यांच्या यकृतावरील मांस वाढले होते. त्याच्यावर शस्त्रक्रिया होणार होती.
त्यांना पाचव्या मजल्यावरील जनरल सर्जरी वॉर्ड क्रमांक ५०३ मध्ये दाखल करण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास त्यांनी अचानक खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. मात्र, त्यांनी उडी मारली की ते पडले, हे अद्याप कळु शकलेले नाही.
या घटनेनंतर एम्समध्ये घबराट पसरली आहे. रुग्णाच्या पोटात मांसाचा गोळा तयार झाल होता. त्याला कर्करोगाशी जोडून निदान प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. २०२२ मध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत एका तरुणाने पाचव्या मजल्यावरूनच आत्महत्या केली होती. हा रुग्ण वॉर्ड क्रमांक ५०५ मध्ये दाखल होता.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासन आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने इमारतीची देखभाल करणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांना खिडक्यांवर ग्रील्स बसविण्याची सूचना केली होती. दोन वर्षे झाली तरी येथे ग्रील बसविण्यात आलेले नाही. एम्समध्ये अलिकडे रूग्णांची गर्दी वाढली आहे. त्या मानाने सुविधा कमी पडतात.





