Swapnil Kusale : संयम आणि मेहनतीचे फळ मिळते – स्वप्निल कुसाळे

पुणे – प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. आयुष्यात संयम आणि मेहनत केल्यावर त्याचे फळ मिळतेच. माझ्या नेमबाजीच्या १५ वर्षांच्या प्रवासाला योग्य फळ मिळाले आहे, असे मत भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेने व्यक्त केले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्वप्नीलचा पीवायसी हिंदू जिमखाना येथे खास सत्कार करण्यात आला. त्या वेळी उपस्थित पालक आणि प्रेक्षकांशी कुसाळेने संवाद साधला. पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याला पीवायसीचे मानद सभासदत्व प्रदान करण्यात आले.
स्वप्नीलने या वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्या गावातून ऑलिम्पिक विजय मंचापर्यंतचा प्रवासाचा आढावा घेतला. खेळात कारकिर्द करण्यासाठी लहान वयातच घर सोडावे लागले. कौशल्य चाचणीनंतर महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली होती. तेव्हा माझ्यासमोर सायकलिंग आणि नेमबाजी या दोन खेळांचा पर्याय देण्यात आला होता, असे स्वप्नीलने सांगितले.
पुणे येथे झालेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धा मी दूरदर्शनवरून पाहिली, तेव्हाच माझ्यावर नेमबाजीचा प्रभाव पडला होता. त्यामुळे मी नेमबाजीची निवड केली, असेही स्वप्नीलने सांगितले. आपल्या नेमबाजी प्रशिक्षणाच्या सुरुवातीविषयी बोलताना स्वप्नील म्हणाला, मी नाशिक येथील शासकीय नेमबाजी अकादमीत प्रवेश घेतला आणि त्यानंतर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ स्पर्धांमधील सहभागाचा माझा मार्ग मोकळा झाला होता.
दीपाली देशपांडेंचे आभार
भारतीय संघाचा भाग म्हणून मला दिपाली देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. कुमार गटापासूनच मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले, तेव्हापासून आजही त्याच माझ्या प्रशिक्षक आहेत. त्यांनीच मला प्रोन एअर रायफल प्रकारातून रायफल थ्री पोझिशनची निवड करायला लावली. माझ्याकडे स्वतःची बंदूक नव्हती. पण, मला पाठिंबा दिल्याबद्दल मी दिपाली देशपांडेंचा कायम ऋणी राहिन. त्याचबरोबर पुणे स्थित एनजीओ लक्ष्यचाही माझ्या या प्रवासात मोठा वाटा आहे, असेही त्याने सांगितले. ऑलिम्पिकसाठी सर्व सुविधा उपलब्ध होत्या. आहारतज्ज्ञ मिळाल्यामुळे खूप फरक पडल्याचे सांगून स्वप्निलने आजपर्यंतच्या प्रवासात लक्ष्य संस्थेचे सुंदर अय्यर, आशिष देसाई, अनिल छाजेड, तसेच अमोल रावेतकर यांचे सहकार्य लाभल्याचे आवर्जुन सांगितले. या वेळी पीवायसीचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, मानद सचिव सारंग लागू यांच्या हस्ते स्वप्नीलच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांचाही गौरव करण्यात आला.




