#Olympics2024 : ऑलिंपिकमध्ये महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या पदक विजेत्या ॲथलीट्सचा शासनाकडून गौरव, बक्षिसरूपी मिळाले ‘इतके’ कोटी…

Olympics 2024 (Maharashtra) : फ्रान्स येथे पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेमध्ये पदक प्राप्त महाराष्ट्रातील खेळाडूंना आज राज्य शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मानचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील ‘ नेमबाजी स्पर्धेमधील 50 मीटर रायफल 3 पोझीशन ‘ या उपप्रकारामध्ये ‘ कांस्य पदक ‘ प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसाळे व पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील ‘ गोळाफेक ‘ या उपप्रकारामध्ये ‘ रौप्य पदक ‘ प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंना तसेच कुसाळे याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे व खिलारी याचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या #ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री @mieknathshinde, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.#olympics2024 pic.twitter.com/EORi35RmfK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 14, 2024
आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या पारितोषिकाच्या रकमेमध्ये केलेल्या भरघोस वाढीच्या पार्श्वभूमीवर आज स्वप्निल कुसाळे यांना दोन कोटी रुपये व त्याच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांना 20 लाख रुपये तसेच सचिन खिलारी यांना तीन कोटी रुपये व त्यांचे प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांना 30 लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह यावेळी प्रदान करण्यात आले.
तसेच बुडापेस्ट, हंगेरी येथे पार पडलेल्या 45 व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे 193 व 181 देशांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत भारताच्या संघाने सुवर्णपदक संपादन करुन ऐतिहासिक कामगिरी केली. या संघात राज्याचे बुद्धीबळपटू विदीत गुजराथी व दिव्या देशमुख यांचा समावेश होता. या दोन्ही खेळाडूंचा राज्य शासनाच्या वतीने प्रत्येकी रोख एक कोटी रुपये व त्यांचे मार्गदर्शक अनुक्रमे संकल्प गुप्ता व अभिजीत कुंटे यांना प्रत्येकी 10 लाख रुपये इतकी रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विदित आणि अभिजीत कुंटे हे परदेशात असल्याने त्यांच्या कुटूंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला.





