पिंपरी | वयाच्या ५० व्या वर्षी दहावी उत्तीर्ण

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील कामशेत येथील रहिवासी व अंगणवाडी मदतनीस स्वाती शिवाजी गायकवाड, बनसोडे या वयाच्या ५० व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून पुढे बारावी करून पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे स्वप्न पहात आहेत.
अंगणवाडी मदतनीस म्हणून कामशेत येथे त्या काम करतात. त्यांनी यंदा दहावीची परीक्षा दिली होती. त्यात 48 टक्के गुण मिळाले आहेत. १९८९ मध्ये त्यांनी नवववीची परीक्षा दिली होती. त्यानंतर सुमारे ३५ वर्षांचा खंड त्यांच्या शिक्षणात पडला.
यंदा त्यांनी दहावीची परीक्षा देत त्यात यश मिळविले. गायकवाड कुटुंबातील सुन व मुले तसेच लर्निंग सेंटर कुसगाव येथील शिक्षिका प्रीती कांबळे व इतरांचे सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे त्यांनी हे यश मिळविल्याचे त्या सांगतात.
1989 मध्ये त्यांनी नववीची परीक्षा दिली होती. त्यानंतर त्यांचा विवाह झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. त्यांना दहावीची परीक्षाही देता आली नाही. मात्र, जिद्द असली की मार्ग सापडतोच, असे म्हणत स्वाती गायकवाड यांना शिक्षणाची आवड असल्याने दहावीची परीक्षा द्यायचे ठरवले व त्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. पुढे बारावीची परीक्षा देऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे, असे त्यांनी सांगितले.





