Parvati Deepotsav: पर्वतीवर प्रकाशोत्सव! हजारो पणत्यांच्या प्रकाशाने उजळला परिसर
Parvati Deepotsav:

Parvati Deepotsav: ऐतिहासिक पर्वती टेकडीवर शुक्रवारी पहाटे ५१ वा पर्वती दीपोत्सव उत्साहात पार पडला. हजारो पणत्यांच्या प्रकाशाने पहाटे पाच ते सकाळी सात या काळात पर्वती परिसर उजळून निघाला. पर्वतीवर नियमित फिरायला येणारे पुणेकर आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन या दीपोत्सवाचे आयोजन केले होते.
शेकडो पुणेकरांच्या उपस्थितीत पर्वतीच्या सर्व पायऱ्यांवर तसेच श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर, भगवान शंकर मंदिर, देवदेवेश्वर मंदिर आणि श्री भगवान विष्णू मंदिर परिसरात हजारो पणत्या लावण्यात आल्या. ठिकठिकाणी काढलेल्या आकर्षक, रंगीबेरंगी रांगोळ्या आणि आकाशकंदीलामुळे परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले होते.
पहाटे पाच ते साडेसहा या वेळेत श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे चौघडा वादक आढाव यांनी विठ्ठल-रखुमाई मंदिराबाहेर चौघडा वादन करून उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी पर्वती देवस्थानचे विश्वस्त आणि पेशवे कुटुंबाचे वंशज पुष्कर पेशवा उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाई मंदिरात सामूहिक आरती झाली.
सिंहगड रस्त्यावरील सनसिटी येथील अंजली फिटनेस क्लबच्या संचालिका अंजली कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली ५० हून अधिक महिला रंगीबेरंगी साड्या परिधान करून पहाटेपासूनच पर्वतीवर आल्या होत्या. त्यांनी श्री भगवान विष्णू मंदिरात पणत्यांची आकर्षक मांडणी करून परिसर प्रकाशमय केला.
अनेक वर्षांपासून पर्वतीवर नियमितपणे येणाऱ्या ज्येष्ठ पुणेकरांचा सत्कार झाला. या दीपोत्सवाचे संयोजन संतोष (बंडू) सकपाळ, विकास सावंत, ज्ञानेश्वर शिवले पाटील आणि अॅड. नम्रता पंडित, विश्वास लेले, भरत उणेचा, भरत सोलंकी, देवयानी प्रभुणे, संतोष राठोड, राजेंद्र ननावरे, पांडुरंग गराडे, राजेश गोरे, पांडुरंग बांदल आदींनी केले. पर्वती ग्रुप, चाची ग्रुप, माऊली ग्रुप, तळजाई ग्रुप आणि पर्वती दीप-महोत्सव ग्रुप यांचे कार्यक्रमाला सहकार्य लाभले.





