PUNE: खासगी डॉक्टरांचा क्षयरोग निर्मूलन मोहिमेत सहभाग; केंद्रीय पथकामार्फत आढावा

पुणे – केंद्र सरकारच्या क्षयरोग निर्मूलन पथकाने मावळ, खेड आणि दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालयांना बुधवारी भेट देऊन आढावा घेतला. राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक पुणे जिल्ह्यात आले आहे. या पथकाने मावळ, खेड आणि दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढवणे, खासगी व्यवसायिकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करावे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी दिल्या.
औषधविक्रेत्यांचाही सहभाग
रुग्ण काही वेळेस उपचार घेण्यास टाळाटाळ करतात आणि उपचार पूर्ण न केल्यास क्षय रुग्णाला धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागते. परिणामी, महागडी औषधे घ्यावी लागतात आणि त्यानंतर तो नियमित औषधोपचारांना दाद देत नाही. हे लक्षात घेता अभियानास बळकटी येण्यासाठी खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांचा सहभाग घेण्यात येत आहे.





