Parsul Fire : परसुलमध्ये आगीचे तांडव! हापूसच्या बागा आणि जनावरांचा चारा जळून खाक; वर्षभराची मेहनत मातीमोल
Parsul Fire : शेततळ्यातील पाण्यामुळे कुक्कुटपालन केंद्राचा बचाव; प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची ग्रामस्थांची मागणी.

Parsul Fire – खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यातील कुडे परिसरातील परसुल गावाजवळ अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीने अचानक रौद्र रूप धारण करत मोठ्या प्रमाणावर नुकसान घडवून आणले. माळरानावर वेगाने पसरलेल्या या आगीत अनेक शेतकर्यांच्या हापूस आंबा बागा, जनावरांचा चारा आणि शेणखत जळून खाक झाले. या घटनेत शांताराम दुंदाजी शिंदे, नामदेव मनाजी गटे आणि शंकर सहादू शिंदे यांच्या हापूस आंब्याच्या झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच किसन महादू शिंदे यांच्या तब्बल पाच ट्रॅक्टर-ट्रॉली शेणखतासह जनावरांसाठी साठवलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. दरम्यान, सह्याद्री कुक्कुटपालन केंद्राच्या परिसरापर्यंतही आग पोहोचली होती. कोंबड्यांसाठी असलेल्या सुविधांसह पिण्याच्या पाण्याच्या शेततळ्यालाही धोका निर्माण झाला होता. मात्र शेततळ्याजवळ लागलेली आग मोटरपंपाच्या साहाय्याने वेळीच आटोक्यात आणल्याने मोठे नुकसान टळले.
परसुल हे गाव जंगल क्षेत्रालगत वसलेले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर माळरान, कोरडे गवत आणि शेती आहे. सध्या शेतीतील निरुपयोगी गवत जाळण्याची प्रथा सुरू आहे. मात्र उन्हाळ्यातील तीव्र उष्णता आणि कोरड्या वातावरणामुळे अशा आगी क्षणार्धात भडकण्याचा धोका वाढला आहे. तरीही काही ठिकाणी निष्काळजीपणे गवत जाळण्याचे प्रकार सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
या आगीत जनावरांसाठी साठवलेला मोठ्या प्रमाणातील चारा जळाल्याने पशुपालक शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम राबवून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.





