पुणे | पावती न देताच मार्केट यार्डात पार्किंग शुल्क वसुली

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे बाजार समितीवर संचालक मंडळ आल्यापासून वाहन चालकांची लूटमार वाढली आहे. समितीचा संबंध नसलेल्या ठेकेदाराकडून बाजार समितीत येणार्या वाहन चालकांकडून पावती न देता नगदी आणि आॅनलाइन पद्धतीने वसुली केली जात आहे. याकडे बाजार समिती दुर्लक्ष करत आहे.
बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डातील शिवनेरी रस्त्यावरदेखील पार्किंग ठेकेदार दहा रुपये पार्किंग शुल्क असताना १२ रुपये घेवून पावती न देण्याचे प्रकार सुरू केले आहेत. या लुटीचे आॅनलाइन पेमेंट स्क्रीन शॉट व्हायरल झाले होते.
गुळ-भुसार विभागात गेट क्र. ३ ते फळे भाजीपाला विभागाची संरक्षक भिंत व गुळ भुसार विभागातील भूखंड क्रमांक ५८०, ५८१ च्या मागील सर्व्हिस लेनमध्ये मनमानी पार्किंग शुल्क वसुलीमुळे ठेकेदार बदलल्यानंतर नवीन ठेकेदारानेही ताळ सोडत रस्त्यावर ताबा मारत वसुली सुरूच ठेवली आहे.
शिवनेरी रस्त्यावर वाहने बाजार समितीच्या पेट्रोल पंपाच्या समोरील बाजूस लावल्या जाणार्या वाहन चालकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल केले जात आहे. या ठेकेदाराला कोणही हटकत नसल्याने संचालक मंडळाचा या सर्व गोष्टींना आशीर्वाद आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
विनापरवानगी शुल्क वसुली हा प्रकार गंभीर आहे. संबंधित ठेकेदार कोण आहे, याचा शोध घेतला जाईल. त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश सुरक्षा व अतिक्रमण नियंत्रण विभागाला ददिले आहेत. – डॉ.राजाराम धोेंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.




