प्रभात वृत्तसेवा पौड – मुळशी तालुक्याच्या मुख्य प्रशासनिक केंद्र असलेल्या पौड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती, ग्रामीण रुग्णालय आणि नुकतेच सुरू झालेल्या दिवाणी–फौजदारी न्यायालय परिसरात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शासकीय कार्यालयांच्या आवारात वाहन पार्किंगस बंदी करण्यात आल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहन उभे करण्याशिवाय पर्याय राहत नाही. याचा थेट परिणाम वाहतूक कोंडीवर होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.नवीन न्यायालय सुरू झाल्यापासून पुणे शहरातून येथे येणाऱ्या वकील व नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आणि पुणे–कोलाड मुख्य मार्गावर वाहनांची सर्रास कोंडी निर्माण होते. अनेकदा रुग्णवाहिकेलाही अडथळा निर्माण होत असल्याचे नागरिक सांगतात. पार्किंग बंदीमुळे नागरिक त्रस्त पौडमधील शासकीय कार्यालयांना येणाऱ्या नागरिकांसाठी काही जागा उपलब्ध असूनही ‘नो पार्किंग’चे फलक लावून पार्किंगवर बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना मजबुरीने रस्त्यावरच वाहन उभी करावी लागतात. वाहतूक कोंडी झाल्यास पोलिसांकडून दंड आकारला जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. “तहसील आवारात गाडी लावण्यासाठी मिळणारी त्रासदायक धडपड नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवत आहे,” अशी परिस्थिती नागरिक व्यक्त करत आहेत.