Paris Paralympics 2024 : तिरंदाजीमध्ये भारतीय मिश्र संघाला कांस्यपदक, शीतल-राकेशनं केली दमदार कामगिरी…

Paris Paralympics 2024 (Archery : Mixed Team Compound Open Bronze Medal Match) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी कायम आहे. भारताच्या शीतल देवी (17 वर्षीय) आणि राकेश कुमार (39 वर्षीय) यांनी पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये विक्रमी कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. पॅरा तिरंदाज शीतल आणि राकेश या जोडीने मिश्र सांघिक तिरंदाजी कंपाऊंड स्पर्धेत हे पदक जिंकले. भारतीय जोडीने सोमवारी कांस्यपदकाच्या लढतीत 156 गुण मिळवले, जो पॅरालिम्पिक विक्रम आहे. इटालियन संघाने 155 गुण मिळवले.
शीतल-राकेशने कांस्यपदक जिंकल्याने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या 13 वर पोहचली आहे. तसेच 17 वर्षीय शीतल देवी इतिहासातील भारताची सर्वात तरुण पॅरालिम्पिक पदक विजेती ठरली आहे. पॅरिस 2024 मध्ये हात नसलेली ती एकमेव महिला तिरंदाज होती.
कांस्यपदकासाठी शीतल देवी आणि राकेश कुमार यांचा सामना इटलीच्या मॅटेओ बोनासिना आणि अलियानोरा सरती या जोडीशी झाला. भारत आणि इटलीच्या जोडींमध्ये चुरशीची स्पर्धा झाली. दुसऱ्या सेटनंतर दोन्ही जोड्या 78-78 अशा बरोबरीत होत्या. तिसऱ्या सेटमध्ये भारताने 38 गुण मिळवले, तर इटालियन जोडीने 39 गुण मिळवले. अशाप्रकारे इटालियन जोडीने तिसऱ्या सेटनंतर 117-116 अशी आघाडी घेतली होती.
THE PRIDE OF INDIA! 🥉🇮🇳
Podium place for Sheetal Devi and Rakesh Kumar at the @Paralympics in Paris.#ArcheryInParis #ParaArchery pic.twitter.com/SxTAAkG3OQ— World Archery (@worldarchery) September 2, 2024
चौथ्या सेटमध्ये पुन्हा एकदा चुरशीची स्पर्धा झाली. यावेळी भारताने पूर्वीपेक्षा चांगली कामगिरी केली आणि सर्वाधिक 40 पैकी 40 गुण मिळवले, तर इटलीला केवळ 38 गुण मिळाले. अशाप्रकारे भारताने चौथ्या आणि निर्णायक सेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत सामना 156-155 असा जिंकला.
Paris Paralympics 2024 : भारताला मिळाले 12वे पदक, सुहास यतिराजनं बॅडमिंटनमध्ये पटकावलं रौप्यपदक…
उपांत्य फेरीत थोड्याशा फरकाने पराभव..
यापूर्वी, शीतल देवी आणि राकेश कुमार यांना उपांत्य फेरीत शूटऑफमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा सामना फतेमेह हेमाती आणि हादी नोरी या इराणी जोडीशी झाला. दोन्ही जोडीने निर्धारित सेटमध्ये 152-152 अशा गुणांसह गेम संपवला होता. यानंतर दोन्ही संघांमध्ये शूटऑफ झाला. शूटऑफमध्ये शीतल, राकेश, फातिमा आणि हादी नोरी यांनी प्रत्येकी 10 गुण मिळवले. या चौघांपैकी फातिमा हेमातीचा निशाणा हा लक्ष्यच्या(Target) अधिक जवळ होता. याच्या आधारावर इराणने भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.





