Paris Paralympics 2024 : भारताचा पदकांचा चौकार, नेमबाजीत मनीष नरवालनं केली कमाल….

Paris Paralympics 2024 (Men’s 10m Air Pistol SH1 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 चा दुसरा दिवस भारतासाठी खूप चांगला राहिला आहे. अवनी आणि मोना यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. दोघींनी 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग (SH1) स्पर्धेत पदके जिंकली. त्याचवेळी प्रीती पाल हिने महिलांच्या 100 मीटर (T35) शर्यतीत कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले. त्यांनतर भारताचा नेमबाज मनीष नरवालने (Manish Narwal) पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एसएच1 (SH1) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रौप्य पदक जिंकताना भारतासाठी पदकांचा चौकार लगावला आहे.
मनीष नरवालने अंतिम फेरीत एकूण 234.9 गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. दक्षिण कोरियाच्या जोन जोंगडूने 237.4 गुण मिळवून या स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले तर चीनच्या यांग चाओ याला 214.3 गुणांसह कांस्यपदकावर समाधान मानावं लागले.
SILVER 🥈 For INDIA 🇮🇳
Manish Narwal wins silver medal in the Men’s 10m Air Pistol SH1 Final with a score of 234.9 🙌#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024 #ParaShooting@mansukhmandviya @MIB_India @PIB_India @IndiaSports @ParalympicIndia @PCI_IN_Official @Media_SAI… pic.twitter.com/tdWTGStMpA
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 30, 2024
दरम्यान, मनीष नरवालने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. त्यावेळी त्याने पी4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच-1 (SH-1) स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.
कोण आहे मनीष नरवाल?
22 वर्षीय मनीष नरवालला सुरुवातीला फुटबॉलपटू व्हायचे होते. पण अपंगत्वामुळे आव्हाने आली, पण ही आव्हाने मनीषला ॲथलीट बनण्याच्या इच्छेपासून परावृत्त करू शकली नाहीत. वडील आणि सहकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार मनीषने 2016 मध्ये शूटिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. नरवालने हरियाणातील फरीदाबादमध्ये शूटिंगच्या सरावाला सुरूवात केली. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. नरवाल याने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत.
मनीष हा सोनीपतचा रहिवासी आहे. मात्र, त्याचे वडील दिलबाग सिंग अनेक वर्षांपूर्वी फरिदाबादमध्ये येऊन स्थायिक झाले होते. मनीषने 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 मीटर आणि 50 मीटर प्रकारात सुवर्ण आणि एक कांस्यपदक जिंकले होते. मनीषने 2019 च्या सिडनी येथे झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या उत्कृष्ट फॉर्मची पुनरावृत्ती केली. त्याने ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतला त्यापैकी तीन स्पर्धांमध्ये त्याने कांस्यपदके जिंकली होती.
Paris Paralympics 2024 : भारताची पदकांची हॅट्ट्रिक, अवनी-मोनानंतर ‘प्रीती पाल’ची कांस्यपदकाला गवसणी…
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 : भारताचे पदक विजेते
1. अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
2. मोना अग्रवाल (शूटिंग) – कांस्य पदक, महिला 10 मीटर एअर रायफल (SH1)
3. प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, महिलांची 100 मीटर शर्यत (T35)
4. मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष 10 मीटर एअर पिस्तूल (SH1)





