Paris Paralympics 2024 : प्रवीण कुमारची ‘सुवर्ण उडी’, High Jump T64 स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल…

Paris Paralympics 2024 (Men’s High Jump T64) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने सहावे सुवर्णपदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने हा पराक्रम केला.
प्रवीणने पुरुषांच्या उंच उडी टी64 (T64) प्रकारात विजयाची नोंद केली. तो अव्वल स्थानावर राहिला आणि भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळाले. भारताच्या नावे यापूर्वी 25 पदके होती. आता ही संख्या 26 झाली आहे. प्रवीणने 2.08 मीटर उंच उडी मारली. जो आशिया खंडात एक विक्रम ठरला आहे.
Play. PRA(WIN). Progress✅🫡
What an extraordinary performance from Para High Jumper Praveen Kumar!
He upgrades his #Tokyo2020 Silver to Gold with a tremendous Personal Best leap of 2.08m and boosts #TeamIndia’s rankings in the #ParisParalympics2024 medals tally.
Savour… pic.twitter.com/2zRuPWdZls
— SAI Media (@Media_SAI) September 6, 2024
उत्तर प्रदेशातील नोएडाचा 21 वर्षीय ॲथलीट प्रवीण कुमार पॅरालिम्पिक उंच उडी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा मरियप्पन थंगावेलू नंतर दुसरा भारतीय ठरला. युनायटेड स्टेट्सच्या डेरेक लोकिडेंटने 2.06 मीटरच्या उडीसह रौप्य, तर उझबेकिस्तानच्या टेमुरबेक गियाझोव्हने 2.03 मीटरच्या उडीसह कांस्यपदक जिंकले. आजच्या अंतिम सामन्यात, टोकियो रौप्यपदक विजेता प्रवीण कुमार याने 2.08 मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम उडीसह सुवर्णपदक जिंकले. यासोबतच प्रवीणने प्रादेशिक आणि आशियाई विक्रमाचीही नोंद केली.
पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे सहावे सुवर्ण ठरले. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने प्रथमच सहा सुवर्णपदके जिंकली आहेत. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने 5 सुवर्णपदके जिंकली होती. प्रवीण कुमारने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होतो. आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्येही त्याने सुवर्णपदक जिंकले आहे.
सहा सुवर्णासह भारत 14 व्या स्थानी…
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रवीण कुमारच्या सुवर्णपदकासह भारताच्या नावावर आता एकूण 26 पदके झाली आहेत. ज्यामध्ये 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 12 कांस्य पदके आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारत पदकतालिकेत 14 व्या क्रमांकावर होता. प्रवीणच्या आधी अवनी लेखरा (नेमबाजी), नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अँटिल (ॲथलेटिक्स), हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धरमबीर (ॲथलेटिक्स) यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत.





