Paris Olympics 2024 : ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या 117 भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र सेना दलाचे 24 जवान, प्रथमच महिलांचाही असणार समावेश…

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय तुकडी पूर्णपणे सज्ज झाली असून टोकियो ऑलिम्पिकमधून खेळाडू आपल्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकण्याचा प्रयत्न करतील. पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताने 117 सदस्यीय तुकडी पाठवण्याचा निर्णय घेतला असून त्यात 24 आर्मी खेळाडूंचाही समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “26 जुलै 2024 पासून सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी सहभागी होणाऱ्या 117 भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील 24 जवानांचा समावेश आहे. या 24 खेळाडूंमध्ये 22 पुरुष असून त्यात भालाफेकपटू सुभेदार नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. याशिवाय या चमूत दोन महिला आहेत. ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच लष्करी महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
2020 टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते सुभेदार नीरज चोप्रा पुन्हा सर्वोच्च सन्मानासाठी मैदानात उतरणार आहेत. 2023 मधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2023 मधील जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप, 2024 मधील डायमंड लीग आणि 2024 मधील पावो नुर्मी क्रीडा स्पर्धा या प्रत्येक स्पर्धेत चोप्रा यांनी सुवर्णपदक मिळवून असामान्य कामगिरी केली आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमधील त्यांचा सहभाग आणखी विशेष बनला आहे.”
➡️ 24 Service personnel among 117 Indian athletes taking part in 2024 #ParisOlympics
➡️Star Javelin Thrower Subedar Neeraj Chopra all set to again vie for top honours
➡️ Indian contingent witnesses maiden participation of women military personnel; Havildar Jaismine Lamboria &…
— PIB India (@PIB_India) July 20, 2024
निवेदनात पुढे म्हटले आहे की, “2022 मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती हवालदार जैस्मिन लॅम्बोरिया आणि 2023 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप मधील कांस्यपदक विजेती सीपीओ रीतीका हुडा या दोघी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यांच्या रुपाने सशस्त्र सेना दलातील महिला कर्मचारी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यश संपादन करून इतिहास रचणे, हेच या दोघींचे ध्येय आहे. या दोघी अनुक्रमे मुष्टीयुद्ध आणि कुस्ती या क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत.”
सैन्याच्या इतर खेळाडूंमध्ये सुभेदार अमित पंघल (मुष्टीयुद्ध); सीपीओ तजिंदरपाल सिंग तूर (शॉट-पुट); सुभेदार अविनाश मुकुंद साबळे (3000 मी स्टीपलचेस); सीपीओ मोहम्मद अनस याहिया, पीओ (जीडब्ल्यु) मोहम्मद अजमल, सुभेदार संतोष कुमार तमिलरासन आणि जेडब्ल्युओ मिजो चाको कुरियन (4X400M पुरुष रिले); जेडब्ल्युओ अब्दुल्ला अबुबकर (तिहेरी उडी); सुभेदार तरुणदीप राय आणि सुभेदार धीरज बोम्मादेवरा (तिरंदाजी) आणि नायब सुभेदार संदीप सिंग (शूटिंग) सशस्त्र सेनेतील या जवानांचा पदक मिळवून देशाला गौरव प्राप्त करून देण्याची मनिषा बाळगणाऱ्यांमध्ये समावेश आहे.





