Boxing : वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मदतीने पुनरागमन करणार – निखत जरीन

नवी दिल्ली :- भारताची दोन वेळेसची विश्वविजेती बॉक्सिंगपटू निखत जरीन (Nikhat Zareen) ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची प्रबळ दावेदार होती. मात्र तिला अव्वल मानांकित आणि चीनची आशियाई विजेती वू यूकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवाने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले होते. पराभूत झाले तो दिवस माझा नवहता, मात्र आता वैयक्तिक प्रशिक्षकाच्या मदतीने आणखी मजबूत पुनरागमन करेल, असा विश्वास निखत जरीनने व्यक्त केला.
ऑलिम्पिक मोहिमेसंदर्भात बोलताना जरीन म्हणाली, कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो, तो दिवस देखील माझा नव्हता. मला प्राथमिक फेरीतच चांगल्या बॉक्सरचा सामना करावा लागला. मी ज्या बॉक्सरला पराभूत केले होते, त्यांनी पदके जिंकली, हे सर्वात दुःखदायक असल्याचे निखत जरीनने बोलताना सांगितले.
वास्तवाचा स्वीकार करून आता पुढे जावे लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत माझ्याकडे वैयक्तिक प्रशिक्षक सोबत नव्हता. मात्र, आता मला प्रशिक्षक हवा आहे, तो प्रशिक्षक मला चांगली बॉक्सर म्हणून घडविण्यास मदत करेल, असे जरीन बोलताना म्हणाली.
जरीनने काही काळ इन्स्पायर संस्थेत प्रशिक्षक घेतले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगल्या सरावाच्या संधी असल्याने आता परदेशात प्रशिक्षण घेण्याची इच्छा जरीनने बोलताना व्यक्त केली.





