Paris Olympics 2024 : विनेश तू एक खरी योद्धा आहेस – अभिनव बिंद्रा

Paris Olympics 2024 (Vinesh Phogat-Abhinav Bindra) : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने देशातील आंदोलनाची पार्श्वभूमी मागे ठेवून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरत तिने अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेशचा फॉर्म पाहता ती सुवर्ण पदकाची दावेदार मानली जात होती. अवघा भारत बुधवारी सुवर्ण पदकाची वाट पाहत होता. या ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर असताना जिंकलेल्या विनेशला पुन्हा नशिबाने हरवले. फक्त 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला स्पर्धेतून अपात्र ठरविले. यामुळे कोणतेही पदक न मिळवताच तिला मायदेशी परतावे लागणार आहे. त्यानंतर तिने अचानक निवृत्ती जाहीर केली. तिने यादरम्यान केलेली मेहनत,संघर्ष आणि घडलेल्या सर्व प्रकरणानंतर अवघ्या देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यानंतर माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने गुरुवारी कुस्तीपटू विनेश फोगटची भेट घेतली आणि तिचे सांत्वन केले. त्यानंतर या भेटीचा फोटो त्यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी तिच्या कामगिरीबद्दल कौतूक करताना “तिच्या लढ्याने त्यांच्या हृदयाला स्पर्श केला आणि ती खरी योद्धा आहे. ती भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात नेहमी लक्षात ठेवली जाईल.” अशी एक मोठी भावूक पोस्ट देखील केली आहे.
Dear Vinesh, It is said that sport is a celebration of human will. I have known that to be true many times in my career but never has it resonated more than today. As I look around me, I see a nation… pic.twitter.com/XflL03FJjY
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 8, 2024
बिंद्रा यांनी तिच्यासोबतच्या भेटीच्या काही छायाचित्रांसह ट्विटर(एक्स) वर लिहिले की, “प्रिय विनेश, असे म्हणतात की खेळ हे मानवी इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. माझ्या कारकिर्दीत अनेकवेळा ही बाब खरी ठरली पण आजच्यापेक्षा जास्त प्रकर्षाने ती कधीच जाणवली नाही. मी आजूबाजूला पाहतोय तर अख्खा देश तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तूझी कारकीर्दीतील मेहनत, आतापर्यंतची वाटचाल आणि तू सध्याच्या कठीण प्रसंगाला ज्या पद्धतीने सामोरे जाते आहेस याचं देशवासीयांना अपार कौतुक आहे. तू एक योध्दा आहेस मग ते मॅटवर असो वा मॅटबाहेर. आपण देत असलेल्या लढ्यामध्ये कधीही हार मानायची नाही, हे आम्ही तुझ्याकडून शिकलो.”
बिंद्रा आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात की, “एक योध्दा काय असतो याला तू मूर्त रूप दिलं आहेस. सर्व विजय सारखे नसतात. काही विजय एक छान स्मरणिका म्हणून कॅबिनेटमध्ये संपतात, परंतु काही विजय हे इतरांना प्रेरणा देणारे असतात जे वर्षानुवर्षे कथांच्या रूपाने पुढच्या पिढ्यान्-पिढ्याना सांगितले जातात. या देशातील प्रत्येक मूल तुला चॅम्पियन म्हणून ओळखेल आणि प्रत्येक मुलाला तू कठीण प्रंसगात दाखवलेली जिद्द, मेहनत आणि लढाऊ वृत्तीप्रमाणे आयुष्याला सामोरे जायला आवडेल. यासाठी मी तुझा आभारी आहे.”
Paris Olympics 2024 (Wrestling) : अमन सेहरावतची सेमीफायनलमध्ये धडक, पदकापासून फक्त एक विजय दूर…
दरम्यान, बुधवारी ऑलिम्पिक फायनलपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले. 29 वर्षीय विनेशला 50 किलो वजनाच्या सुवर्णपदकाच्या सामन्यातून 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले, त्यानंतर तिने अचानक निवृत्ती जाहीर केली. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही पहिली भारतीय महिला कुस्तीपटू आहे.





