Paris Olympics 2024 (Weightlifting) : मीराबाई चानूचे पदक थोडक्यात हुकले…

Paris Olympics 2024 (Mirabai Chanu, Weightlifting,Women’s 49kg) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने आतापर्यंत तीन कांस्य पदके जिंकली आहेत. भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूने सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारताचा 12वा दिवस आहे आणि वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारातून भारतासाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मीराबाई चानूचे पदक हुकले आहे. मीराबाईने स्नॅच आणि क्लीन ॲण्ड जर्क फेरीत एकत्रितपणे एकूण 199 किलो वजन उचलले आणि ती चौथ्या क्रमांकावर राहिली.
मीराबाईने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले होते तर क्लीन अँड जर्कमध्ये ती केवळ 111 किलोच उचलू शकली. क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 114 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली.मीराबाई चानूने क्लीन अँड जर्कमध्ये निराशाजनक कामगिरी केली. तिला तिसऱ्या प्रयत्नात 114 वजन उचलता आले नाही त्यामुळे या फेरीतील तिचा सर्वोत्तम प्रयत्न 111 किलो वजन उचलण्याचा होता. त्यामुळे मीराबाई चौथ्या क्रमांकावर राहिली.
चीनच्या हौ झिहुईने एकूण 206 किलो वजन उचलून अव्वल स्थान पटकावले, तर रोमानियाच्या मिहाएला व्हॅलेंटिनाने 205 किलो वजन उचलून रौप्यपदक तर थायलंडच्या खांबाओ सुरोदचानाने एकूण 200 किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.
दरम्यान, गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकून चानूने भारताचे पदकांचे खाते उघडले होते. मात्र त्यानंतर तिला दुखापतींनी त्रास दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती चांगली तयारी करू शकली नाही. टोकियोनंतर राष्ट्रकुल खेळांमध्ये 201 किलो (88 किलो, 113 किलो) वजन ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे. तिने टोकियोमध्ये 202 किलो (87 किलो आणि 115 किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले होते.





