Paris Olympic 2024 : भालाफेकमध्ये केवळ नीरज चोप्राच नाही, तर ‘हे’ खेळाडूही भारताला जिंकून देऊ शकतात पदक…

Paris Olympic 2024 (Javelin Throw) : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये 2024 ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भारत आपल्या सर्वात मोठ्या तुकडीसह जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारतीय चाहत्यांना यावेळी ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या आशा आहेत. गेल्या वेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने 7 पदके जिंकली होती. यावेळी भारत पदकांच्या बाबतीत दुहेरी आकडा पार करेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये भालाफेक स्पर्धेत भारत सुवर्णपदक निश्चित जिंकेल अशी सर्वांना खात्री आहे.
भारताला ‘या’ दोन खेळाडूंकडून आहेत आशा…
नीरज चोप्राने गेल्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भालाफेक हा खेळ भारतात खूप वाढला आणि चांगलाच प्रसिध्दझोतात आला. यावेळी केवळ नीरज चोप्राच नाही तर भालाफेक स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारे आणखी दोन खेळाडू आहेत.
हे खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून किशोर जेना आणि अन्नू राणी हे आहेत. किशोर जेना नीरज चोप्रासोबत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भाग घेत आहे. अन्नू राणी महिलांच्या भालाफेक स्पर्धेत सहभागी होणार आहे. किशोर जेना हा भारतातील सर्वात प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकावले. तो थोड्या फरकाने सुवर्णपदक जिंकू शकला नाही.
तसेच दुसरीकडे अन्नू राणी ही जागतिक स्तरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय आणि नीरज चोप्रानंतरची पहिली भारतीय महिला आहे. तिने हांग्जो येथे आशियाई खेळ 2023 मध्ये महिला भालाफेक स्पर्धेत 69.92 मीटर फेक करून सुवर्णपदक जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये भालाफेक खेळ कधी झाला सामील ?
लंडन ऑलिम्पिक खेळांमध्ये 1908 साली पहिल्यांदा भालाफेक या खेळाला आधुनिक ऑलिम्पिक खेळांचा भाग बनवण्यात आले. 1932 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये महिला भालाफेक स्पर्धेची सुरूवात झाली. 2021 मध्ये भारताने या स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले.





