Paris Olympics 2024 : परचम लहरा दों…! आजपासून क्रीडामहाकुंभास प्रारंभ, भारताच्या 117 क्रीडापटूंकडून पदकांची आस…

पॅरिस – फ्रान्सची राजधानी पॅरिस क्रीडा महाकुंभ ऑलिम्पिक २०२४ च्या आयोजनासाठी सज्ज झाली आहे. आयफेल टॉवरसाठी प्रसिद्ध असणारी ही नगरी पुढील २० दिवस विविध देशांच्या क्रीडापटूंनी गजबजलेली असणार आहे. विश्वातील सर्वोत्तम क्रीडापटू क्रीडाप्रकारात पोडीअमवर पदक गळ्यात घालून आपल्या देशाचे राष्ट्रागाण ऐकण्याच्या सोनेरी क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी आपली बाजी लावताना दिसणार आहेत. यंदा भारताचे तब्बल ११७ खेळाडू १६ विविध क्रीडाप्रकारांत, देशाचा ‘परचम’ अर्थात तिरंगा फडकावून ‘जन-गन-मन’ हे राष्ट्रगीत वाजल्यानंतर अंगावर शहारे आणणारे क्षण अनूभविण्यासाठी सज्ज झाले आहे.
पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासात तिसऱ्यांदा खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते. त्यात, यंदाचा ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियमवर न होता, पहिल्यांदाच पॅरिस शहारातून वाहणाऱ्या ‘सीन’ नदीच्या काठावर होणार आहे.
ऑलिम्पिक २०२४ तब्बल १० हजार खेळाडू सहभागी होणार असून, त्यातील काही खेळाडू शुक्रवारच्या उद्घाटन समारंभाचा भाग असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू बोटीतून परेड करतील. ही परेड सहा किमी इतकी लांब असेल जी सीन नदीवर होईल. ही परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू होईल आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचेल. सुमारे ९४ बोटी या परेडचा भाग असतील.
कोण पहिला? कोण शेवट?
ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या अक्षरानुक्रमे ठरवला जातो. त्यामुळे चायनीज तैपेई ताझिकिस्तान आणि टांझानिया यांच्यामध्ये १८०वा देश म्हणून मार्चपास्ट करतील. परंतू, त्याआधी ऑलिम्पिकचे जन्मस्थळ समजला जाणाऱ्या ग्रीसचे खेळाडू आधी मार्चपास्ट करतील. या वर्षी ग्रीसचा ध्वजवाहक रेस वॉकर अँटिगोनी दृष्टीबिओटी असेल. तर प्रथेप्रमाणे, यजमान देश मार्चपास्टच्या शेवटी असतो. यावेळी फ्रान्सचे खेळाडू मार्चपास्टमध्ये सर्वात शेवटी असतील. फ्रान्सच्या आधी पुढच्या ऑलिम्पिकचे म्हणजे २०२८ चे यजमानपद मिळवलेला देश म्हणजे अमेरिका असेल.
परेडचे वैशिष्ट्ये…
तब्ब्ल १० हजार खेळाडूंचा सहभाग
संपूर्ण सहा किमीची परेड बोटीतून होणार
ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरुवात, आयफेल टॉवरपाशी समारोप
सुमारे ९४ मोठ्या बोटी असणार परेडचा भाग
स्पर्धा कालावधी…
२६ जुलै ते ११ ऑगस्ट
स्पर्धा ठिकाणेः ३५
स्पर्धेकः १०,५००
स्वयंसेवकः २०,०००
क्रीडा प्रकारः ३२९
भारताची ऑलिम्पिक कामगिरी..
सुवर्णः १०
रौप्यः ०९
कांस्यः १६
एकूणः ३५





