Paris Olympics 2024 (Hockey) : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 3-2 ने विजय, 52 वर्षांनंतर प्रथमच ऑलिम्पिकमध्ये कांगारूंचा केला पराभव…

Paris Olympics 2024 (Hockey), IND vs AUS : भारतीय हॉकी संघाचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी झाला. उपांत्यपूर्व फेरीपूर्वी हरमनप्रीत सिंगच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. यासह भारत उपांत्यपूर्व फेरीपूर्वी विजयी मार्गावर परतला आहे. विशेष म्हणजे भारतीय हॉकी संघाने तब्बल 52 वर्षांनंतर ऑलिम्पिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. 1972 म्युनिक ऑलिम्पिकनंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच भारताचा कांगारू संघाविरुद्धचा हा विजय ऐतिहासिक ठरला आहे.
टीम इंडियाकडून हरमनप्रीत सिंह याने पुन्हा एकदा कर्णधारपदाला साजेशी भूमिका बजावली. हरमनप्रीतने सर्वाधिक 2 गोल केले. तर अभिषेकने 1 गोल केला. तर ऑस्ट्रेलियाकडून थॉमस क्रेग आणि ब्लेक गोवर्स या दोघांनी प्रत्येकी 1-1 गोल केला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या क्षणी आणखी एक गोल करुन सामना बरोबरीत सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंनी यशस्वीपणे आघाडी कायम राखून विजय मिळवण्यात यश मिळवलं.
The #MenInBlue outclass Australia in a thrilling match at the #ParisOlympics2024 to finish second in Pool B with 10 points (3 Wins, 1 Draw , 1 Loss).
This is India’s first-ever win over Australia in the Olympics since 1972 Munich.
With brilliant saves by PR Sreejesh and… pic.twitter.com/1vhlIZ2JF1
— SAI Media (@Media_SAI) August 2, 2024
शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्या क्वार्टरच्या 12व्या मिनिटाला अभिषेकने गोल नोंदवला आणि भारताने 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर हरमनप्रीत सिंगने 13व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. यासह भारताने 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचे खाते दुसऱ्या क्वार्टरमध्ये उघडले. 25व्या मिनिटाला क्रेग थॉमसने गोल केला आणि भारताची आघाडी 2-1 अशी कमी झाली. त्यानंतर मध्यंतरापर्यंत भारत 2-1 ने आघाडीवर होता.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने दमदार खेळ कायम ठेवला. सामन्याच्या 32व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर गोल केला. यासह भारताने 3-1 अशी आघाडी घेतली. तीन क्वार्टरनंतर भारताने ऑस्ट्रेलियावर 3-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र चौथ्या क्वार्टरमध्ये 55व्या मिनिटाला ब्लेक गोव्हर्सने गोल करत ऑस्ट्रेलियाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे आक्रमण थोपवून धरताना आणखी गोल होऊ न देता विजय साकारला.
1972 पासून ऑलिम्पिकमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
1972 – भारत 3-1 ऑस्ट्रेलिया
1976 – भारत 1-6 ऑस्ट्रेलिया
1976 (प्लेऑफ) – भारत 1-1 (4-5 शूटआउट)
1984 – भारत 2-4 ऑस्ट्रेलिया
1992 – भारत 0-1 ऑस्ट्रेलिया
2000 – भारत 2-2 ऑस्ट्रेलिया
2004 – भारत 3- 4 ऑस्ट्रेलिया
2020 – भारत 1-7 ऑस्ट्रेलिया
2024 – भारत 3-2 ऑस्ट्रेलिया
पुढची लढत ग्रेट ब्रिटन सोबत ??
भारतीय संघाने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. भारताने अनुक्रमे न्यूझीलंड आणि आयर्लंड संघांवर विजय मिळविला होता. त्यानंतरच्या तिसऱ्या लढतीत बलाढ्य अर्जेंटिना संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते. मात्र गुरुवारी झालेल्या लढतीत बेल्जीयम संघाकडून भारताचा पराभव झाला. आज बाद फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले आहे.
पूल-बी मध्ये भारताशिवाय न्यूझीलंड, अर्जेंटिना, आयर्लंड, बेल्जियम आणि ऑस्ट्रेलिया आहेत. तर पूल-अ मध्ये नेदरलँड, जर्मनी, ब्रिटन, स्पेन, दक्षिण आफ्रिका आणि यजमान देश फ्रान्स यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील प्रत्येकी चार संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत. पूल-बीमध्ये दुसरे स्थान मिळवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तर पूल-बी मध्ये बेल्जियम अव्वल स्थानावर राहिला आहे . ऑस्ट्रेलिया आणि अर्जेंटिना यांनीही पूल-बी मधून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. भारतासमोर उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचे आव्हान असण्याची शक्यता आहे. परंतु हे समीकरण शुक्रवारी मध्यरात्री स्पष्ट होणार आहे.





