Pune : सर्कसची कला, कलाकार जगले पाहिजेत

पुणे : सर्कस ही एक कला असून, मनोरंजनासाठीचा एक जिवंत खेळ आहे. त्यामुळे ही कला आणि यातील कलाकार जगले पाहिजेत, असे मत नगरविकास, सामाजिक न्याय व परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. सर्कसमधील कलाकारांच्या सर्व मागण्या शासनाकडे मांडू, असेही अश्वासन मिसाळ यांनी दिले.
सिंहगड रस्त्यावरील रॅम्बो सर्कसमधील डिजिटल हत्तीचे आणि सर्कसचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, रॅम्बो सर्कसचे संचालक सुजीत दिलीप, जॉन, अरुल होरायझन, प्रतीक खर्डेकर, सोनाली गुप्ते, कल्याणी खर्डेकर, प्रा. चेतन दिवाण उपस्थित होते.
कलाकार जीवापाड मेहनत घेऊन आपली कला सादर करतात, असे सांगत संदीप खर्डेकर म्हणाले, की पूर्वी चित्रपटांच्या बरोबरीत सर्कस बघायला गर्दी होत असे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे.
त्यामुळे शासनाने सर्कशीतील कलाकारांकडे लक्ष देणे गरजेचे असून, या कलाकारांना पंतप्रधान घरकुल योजनेतून अल्प दरात घर उपलब्ध करून देणे आणि त्यांना पेन्शन देणे गरजेचे आहे. सुजीत दिलीप त्यांच्या समस्या मांडत त्या सोडविण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले.




