“लाखो चाहत्यांच्या मनात आहे की….”; गुणरत्न सदावर्तेंची मोठी घोषणा! आता राजकारणात एन्ट्री करणार

Gunaratna Sadavarte : अॅड गुणरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेली अनेक विधाने वादाच्या भोवऱ्यातही सापडतात. तसेच अनेकदा ते त्यांच्या विधानांमधून राजकीय नेत्यांवर थेट टीका करताना दिसतात. नुकत्याच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सदावर्तेंनी मोठी घोषणा केली आहे. आगामी पाडव्यापर्यंत राजकारणात सहभागी होणार असल्याचे म्हणत लवकरच निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा गुणरत्न सदावर्तेंनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले सदावर्ते?
लाखो चाहत्यांच्या मनात आहे की मी राजकारणात थेट आलो पाहिजे आणि येणाऱ्या पाडव्यापर्यंत राजकारणात येईन, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत. थोडा इंतजार करो, थोडासा, याच शोमध्ये पाडव्यानिमित्त ती घोषणा, राजकारणाबाबत नकारात्मक नाही, नक्की मी आशादायी आहे, असेही सदावर्ते म्हणाले.
नक्की डंके की चोट पे…
पण पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना वाहून घेतलेला माणूस आहे. त्याच्यामुळे मला ज्येष्ठ, गुरुवर्य ज्या क्षणाला सांगतील, राजकारणात थेट तुमची गरज आहे, नक्की डंके की चोट पे मी तुम्हाला राजकारणात दिसेल, असे गुणरत्न सदावर्तेंनी सांगितले.त्यामुळे आता त्यांनी केलेल्या या घोषणेमध्ये जेष्ठ गुरुवर्य कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.
राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस
गुणरत्न सदावर्ते हे नेहमी त्यांच्या विधानामधून अनेक सवाल उपस्थित करत असतात. तसेच राजकीय नेत्यांवर थेट बोलताना दिसतात. नुकतीच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले होते. राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस आहेत, असे सदावर्ते म्हणाले होते.
२०१८ मध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी केलेली अनेक दावे आणि विधाने यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.





