Paris Olympics 2024 (Neeraj Chopra,Men’s Javelin Throw) : – स्पर्धेत मी माझे सर्वोत्तम दिले, परंतू काही गोष्टींवर काम करणे आणि सुधारणा करणे आता आवश्यक आहे. कालचा दिवच माझा नव्हता तो, अर्शदचा होता. असो, भारताचे राष्ट्रगीत यंदा वाजविता आले नसले तरी ते भविष्यात वाजेल यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, असे मत भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने रौप्य कामगिरीची नोंद केल्यानंतर व्यक्त केले.
नीरजने ८९.४५ मीटर भालाफेक केली. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आणि ऑलिम्पिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सला (८८.५४ मीटर) कांस्यपदक मिळाले. अशाप्रकारे, 26 वर्षीय नीरज सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. नीरजचे वडील सतीश चोप्रा यांनी आपले पदक विनेश फोगाटला समर्पित केले. त्याचवेळी आई सरोज देवी यांच्या प्रतिक्रियेने मात्र सर्वांची मने जिंकली आहेत.
सरोज देवींनी जिंकली मने
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नीरजची आई सरोज देवी यांनी दिलेल्या प्रतिक्रीया सर्वांना भारावून टाकणारी होती. त्या म्हणाल्या, आम्ही खूप आनंदी आहोत. आमच्यासाठी ही चांदीही सोन्याच्या बरोबरीची आहे. ज्याने सुवर्ण जिंकले (अर्शद नदीम), तोही आमच्या मुलासारखा आहे. नीरजने जखमी असताना केलेल्या कामगिरीवर आम्ही खूप खुश आहोत, असेही त्या म्हणाल्या.
मां तो मां होती है
नीरज चोप्राच्या आईचे वक्तव्य सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. त्यांच्या वक्तव्यावर कुस्तीपटू बजरंग पुनियाने एक भावनिक ट्विटही केले. बजरंगने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, आई ही आई असते… तिला नीरजच्या संघर्षाबद्दल आणि सीमेपलीकडे राहणारा नीरज चोप्राचा मित्र अर्शद नदीमबद्दलही माहिती आहे… दोघांची मैत्री आहे कारण ते देशाचे भाऊ आहेत. नीरज आणि अर्शदच्या मैत्रीत बंधुत्वाचा संदेश दडला आहे. पण आपल्या सगळ्या माता अशाच असतात. कारण, ऐ दुनिया वालों माँ तो माँ होती हैं, अशी पुनियाने लिहले आहे.
नीरज माझा मुलगा अर्शदचा चांगला मित्र आणि भाऊपण आहे. हार-जीत नशिबाने होते. नीरजही माझ्या मुलासारखाच आहे. मी त्याच्यासाठीही प्रार्थना केली.
– रझीया परवीन, अर्शद नदीमची आई
पंतप्रधानांचा फोन तसेच, पोस्टही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य कामगिरीनंतर नीरजला फोन करत त्याला शुभेच्छा दिल्या. यासह, एक्स पोस्टद्वारे नीरजचे त्यांनी अभिनंदनही केले. त्यांनी लिहिले- ‘नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे मूर्त स्वरूप आहेत. वेळोवेळी त्यांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. भारताने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळवले याचा आनंद आहे. रौप्यपदक जिंकल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तो हजारो आगामी क्रीडापटूंना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देत राहतील.
अर्शदमुळे पाकिस्तान पदकतालिकेत वरचढ
पॅरिस ऑलिम्पिक खेळांच्या पदकतालिकेत भारत 64 व्या, तर पाकिस्तान 53 व्या स्थानावर पोचला आहे. अर्शद नदीमच्या एकमेव सुवर्णपदकाने पाकिस्तानचे नशिब उजळले आहे. भारताने एकूण पाच पदके जिंकली आहेत, तर पाकिस्तानच्या खात्यात फक्त एकच पदक आहे, पण तरीही पाकिस्तान पदकतालिकेत भारतापेक्षा वरचढ आहे.