Neeraj Chopra : नीरजचा गोल्डन स्पाइकवर कब्जा, पण स्वतःच्या कामगिरीवर का नाराज?

Neeraj Chopra Wins Golden Spike 2025 : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. चेक रिपब्लिकमध्ये झालेल्या ओस्ट्रावा गोल्डन स्पाइकमध्ये गोल्डन बॉय नीरजने सुवर्णपदक जिंकले. यासह, त्याने आणखी एका आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धेत देशाचे नाव उंचावले आहे. या स्पर्धेत त्याने ८५.२९ मीटर भाला फेकला, जो काही दिवसांपूर्वी दोहा येथे केलेल्या त्याच्या ९०.२३ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीपेक्षा खूपच कमी होता. त्यामुळे तो स्वत: आपल्या कामगिरीवर समाधानी नाही.
नीरज त्याच्या कामगिरीवर समाधानी नाही –
नीरज चोप्रा म्हणाला, “मी आज माझ्या कामगिरीबद्दल फारसा समाधानी नाही, पण जिंकलेल्या ट्रॉफीमुळे मी खूप आनंदी आहे. लहानपणी मी ही स्पर्धा खूप पाहायचो. मी जॉन झेलेझनी आणि युसेन बोल्ट यांना गोल्डन स्पाइक जिंकताना पाहिलं होतं आणि मीही ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मला माहीत आहे की चेकियामध्ये भालाफेक खूप लोकप्रिय आहे. प्रेक्षकांकडून मिळालेलं समर्थन अप्रतिम होतं. मला वाटतं, मी त्यांच्यासाठी आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो.”
ओलिम्पिक पदक विजेता नीरज चोपड़ा ने ओस्ट्रावा गोल्डन स्पाइक प्रतियोगिता में स्वर्ण पदक जीता। नीरज ने सर्वश्रेष्ठ प्रयास में 85.29 मीटर दूर भाला फेंका। #NeerajChopra #Ostrava #javelinthrow pic.twitter.com/naPksCcSKj
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) June 25, 2025
दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्राने तिसऱ्या फेरीत आपला विजयी थ्रो नोंदवला. पहिल्या फेरीत फाऊल आणि दुसऱ्या फेरीत ८३.४५ मीटरच्या थ्रो नंतर, त्याने ८२.१७ मीटर आणि ८१.०१ मीटरचे थ्रो केले, तर अंतिम फेरीत पुन्हा एक फाऊल केला. आपल्या उच्च दर्जाच्या मानकांनुसार कमी गुण मिळाले तरी, त्याने या हंगामात आपली मजबूत कामगिरी कायम ठेवली. काही दिवसांपूर्वी पॅरिसमधील डायमंड लीग जिंकल्यानंतरही त्याचा हा सातत्यपूर्ण फॉर्म दिसून आला.
हेही वाचा – IND vs ENG : डकेट-कॉलीच्या जोरावर इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! ऋषभ पंतची दोन शतकं ठरली व्यर्थ
नीरजचा पुढील सामना शनिवार, ५ जुलै रोजी बंगळुरु येथे एनसी क्लासिकमध्ये होणार आहे, जिथे पीटर्स आणि रोहलर यांच्याशीही त्याची स्पर्धा अपेक्षित आहे. नियमित ९० मीटर थ्रोच्या दबावाखाली न येता, नीरजने सांगितलं होतं की, ओस्ट्रावामधील गोल्डन स्पाइक अॅथलेटिक्स मीटबद्दल त्याला चांगलं वाटत होतं, कारण तो या वर्षीच्या आपल्या अंतिम ध्येयासाठी, म्हणजे टोक्यो येथील विश्व चॅम्पियनशिपमध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी तयारी करत आहे.





