Parinay Phuke: रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत? ; परिणय फुके यांचा मोठा दावा
Parinay Phuke: भंडारा-गोंदिया दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Parinay Phuke: भंडारा-गोंदिया दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेते परिणय फुके यांनी गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार हे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा फुके यांनी केला आहे. नाना पटोले यांना खूश करण्यासाठीच रोहित पवार यांनी भंडारा-गोंदिया दौरा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रोहित पवार यांनी छत्तीसगडमध्ये अभ्यास दौरा केला. धानाला दर्जेदार भाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांना बोनस मिळावा, अशी मागणी करण्यात आली. पुढील अधिवेशनापर्यंत धान खरेदीबाबत जीआर काढण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना बोनस देण्याबाबतही सरकार सकारात्मक असून बोनस जाहीर केला जाईल, असा दावा फुके यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात मतभेद असल्याचा दावा परिणय फुके यांनी केला. त्यामुळेच रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचे दिसत असल्याचे ते म्हणाले.
ओबीसी आरक्षणावरही फुके आक्रमक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, दबावाखाली किंवा चुकीच्या नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्यात आले असल्यास त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका फुके यांनी मांडली. मनोज जरांगे पाटील संविधानाच्या चौकटीत न बसणाऱ्या मागण्या करत असल्याची टीकाही त्यांनी केली.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नसल्याचा दावा फुके यांनी केला. तसेच मराठा समाजाला EWSमधील 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही धमक्यांना सरकार घाबरणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पार्थ पवार प्रकरणावर काय म्हणाले?
पार्थ पवार यांच्या प्रकरणाबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे परिणय फुके यांनी स्पष्ट केले. MPSC अध्यक्षांनी पेपरफुटी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या अतिरिक्त मुदतीचा अभ्यासासाठी फायदा होईल, असेही त्यांनी म्हटले.






