Paresh Rawal: ‘हेरा फेरी 3’मध्ये परतणार बाबूराव! परेश रावलची पुष्टी

Paresh Rawal: बॉलीवूडचा सुपरहिट कॉमेडी चित्रपट ‘हेरा फेरी’ मालिकेचा तिसरा भाग आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्गज अभिनेता परेश रावल यांनी स्वतःच पुष्टी केली आहे की ते या चित्रपटात पुन्हा एकदा बाबूराव गणपतराव आपटे या लोकप्रिय भूमिकेत दिसणार आहेत.
मतभेद आता संपले
एका पॉडकास्टमध्ये बोलताना परेश रावल म्हणाले, “कोणताही वाद नाही. प्रेक्षकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यामुळे ही आपली जबाबदारी आहे की आपण त्यांना दर्जेदार काम देऊ. मेहनत करून प्रेक्षकांना चांगला चित्रपट द्यायला हवा. आता सर्व मतभेद मिटले आहेत.”
जेव्हा त्यांना विचारलं की चित्रपटात ओरिजनल कास्ट असेल का, तेव्हा त्यांनी हसत उत्तर दिलं, “हो, आधीही यायला हवं होतं, पण आम्हाला अजून चांगलं तयार व्हायचं होतं. शेवटी प्रियदर्शन, अक्षय आणि सुनील हे सगळे जुने मित्र आहेत आणि खूप क्रिएटिव्ह आहेत.”
वाद आणि चर्चांनंतरही परतले
अलीकडेच परेश रावल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितलं होतं की ते ‘हेरा फेरी 3’ चा भाग नसतील. त्यांनी स्पष्ट केलं होतं की हा निर्णय दिग्दर्शकाशी वादामुळे नव्हता. दरम्यान, अशीही चर्चा होती की अक्षय कुमारने त्यांच्यावर २५ कोटींचं नुकसान झाल्याचा दावा केला होता.
मात्र आता सगळे वाद बाजूला ठेवून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल ही ओरिजनल तिकडी पुन्हा एकत्र येणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.




