नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी कॉंग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जारी केली. त्या यादीत बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनाही स्थान मिळाले आहे. बिहारमध्ये २ टप्प्यांत विधानसभा निवडणूक होईल. त्या राज्यात ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक ज्वर वाढीस लागला असताना कॉंग्रेसने पहिल्या टप्प्यासाठी स्टार प्रचारक निश्चित केले. त्यामध्ये पप्पू यादव यांचा समावेश लक्षवेधी ठरला. अपक्ष खासदार असले तरी ते काही काळापासून कॉंग्रेसशी जवळीक साधून आहेत. प्रभावी वक्ते अशी ओळख निर्माण केलेले तरूण नेते कन्हैय्या कुमार हेही स्टार प्रचारक म्हणून प्रचाराचा धुरळा उडवून देतील. कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हे अर्थातच पक्षाचे प्रमुख स्टार प्रचारक आहेत. पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचाही स्टार प्रचारकांमध्ये समावेश आहे. मात्र, त्या प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होणार का याविषयी उत्सुकता असेल. छठ पूजेनंतर प्रमुख नेत्यांच्या सहभागामुळे कॉंग्रेसची प्रचार मोहीम खऱ्याअर्थी जोर पकडेल. राहुल २९ आणि ३० ऑक्टोबरला प्रचारसभा घेतील. त्याशिवाय, खर्गे आणि प्रियंका यांच्याही प्रचारसभांची आखणी केली जात आहे.