TET Paper Leak : मोठी बातमी! नीटनंतर आता आणखी एक पेपर फुटला; परीक्षा रद्द
TET Paper Leak : उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर ठाण्यातून फुटला

Paper Leak : शिक्षक पात्रता परीक्षेचा म्हणजेच टीईटीचा पेपर फुटला असल्याची माहिती समोर आली. यामुळे आता उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्या रविवार, २८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर ठाण्यातून फुटला असून तो नेमका कोणत्या यंत्रणेद्वारे फुटला हे समोर आलेले नाही.
टीईटीच्या परीक्षेला यंदा 4 लाख 28 हजार 122 परीक्षार्थी बसले होते. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक 45 हजार 562 परीक्षार्थी आहेत. दरम्यान, NEET परीक्षेनंतर पुन्हा एकदा महत्वाच्या परीक्षेचा पेपर फुटल्यानं अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (TET Paper Leak)
कसा फुटला पेपर? (TET Paper Leak)
NEET 2026 च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. मात्र आज 27 जून, 2026 रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजले.
त्यानंतर भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर पडताळणी केली असता सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. (TET Paper Leak)
परीक्षा पुढे ढकलण्यात आली (TET Paper Leak)
याप्रकरणी 28 जून, 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
तसेच शिक्षक पात्रता परिक्षेबाबत अद्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा:
Raj Thackeray : राजीनामा द्या आणि भाजपमध्ये सामील व्हा! राज ठाकरे विश्वास नांगरे पाटलांवर भडकले






