बीड : गोपीनाथ मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र गोळा केले तर एक वेगळा पक्ष उभा राहील, असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होते. अखेर आज पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे, मी कशाला पक्ष स्थापन करेन, माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात राजकारण आहे. भाजप म्हणजे मुंडे साहेबांचा पक्ष, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीड जिल्ह्यातील आष्टी विधान सभा मतदार संघात बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, मी कोणत्या गुंडाला घाबरत नाही. मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे. मी कशामुळे नवीन पक्ष स्थापन करेल. दिल्लीमध्ये नरेंद्रजी मोदी यांची सत्ता आहे. राज्यात देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत. मी स्वतः मंत्री आहे असं असताना मी नवीन पक्ष का काढेल? असं स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. प्रत्येक दिवस परळीसाठी मी मंत्री झाले काय, नाही झाले काय, काही फरक पडत नाही. एवढे प्रेम तुम्ही करता, पण मंत्रीपदामुळं अधिकार येतात. प्रत्येक दिवस परळीसाठी आहे. 1825 दिवस आहेत माझ्याकडे सत्तेचे. वरचे 225 दिवस असेच जातात. माझ्या 1600 दिवसात राज्यातील प्रत्येक भागात माझ्या विभागाकडून न्याय देण्याचं काम करेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही धर्मसत्ता आणि राजसत्ता हातात हात घालून चालत असते. बीड जिल्ह्यातले 25 ते 50 हजार कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारून आलेत. म्हणजे पुढचे पाप करायला मोकळे झालेत का? भगवान बाबांच्या दर्शनासाठी मला कुठेही जावे लागत नाही. मी डोळे जरी झाकले तरी मला साक्षात भगवान बाबाचे दर्शन होते. मी स्वतः भगवान बाबा पाहिले नाहीत. मात्र अनेक काहण्या ऐकल्या आहेत असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यांना एकत्रित केल्यास एखादा पक्ष उभा राहील. गोपीनाथ मुंडे यांचे गुण आत्मसात केल्यामुळे ही सर्व मंडळी आपल्याशी जोडली गेली आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केले होते. त्यांच्या या विधानाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या.