Pankaja Munde : पंकजा मुंडे राजकारणातून रिटायर्ड होणार? ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Pankaja Munde : राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Pankaja Munde : भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. परळीतील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी, कधी कधी राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं, असे भावनिक विधान केले. मात्र, जनतेचा उत्साह आणि प्रेम पाहिल्यानंतर नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Pankaja Munde)
परळी महामार्गाच्या दुरावस्थेचा उल्लेख करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, या रस्त्यावरून प्रवास करताना मी माझ्या पीएला म्हटलं की, आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतं. पण येथे उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. यावेळी त्यांनी विकासकामांबाबतही भूमिका मांडली. ही लाल दिव्याची गाडी माझ्यासाठी नाही, तर तुमच्या विकासासाठी आहे, असे त्या म्हणाल्या. (Pankaja Munde)
दरम्यान, पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीचेही कौतुक केले. दिल्लीतील भाजप कोअर कमिटीच्या बैठकीतील अनुभव सांगताना त्यांनी म्हटले की, अमेरिकेचा दौरा पूर्ण करून आलेले पंतप्रधान मोदी सलग अनेक तास बैठकीत उपस्थित राहिले आणि प्रत्येक विषयाचा सविस्तर आढावा घेतला. (Pankaja Munde)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशाशी असलेली भावनिक बांधिलकी प्रेरणादायी आहे. त्यांनी देशालाच आपला परिवार मानले आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. दरम्यान पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या असल्या, तरी त्यांनी जनतेसाठी काम करत राहण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला आहे. (Pankaja Munde)






