Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava – शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरू असताना, आता बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि भगवान गड दसरा मेळावा कृती समितीत संघर्ष सुरू झाला आहे. या संघर्षाचा परिणाम म्हणजे आष्टीतील जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे या राजीनामा नाट्यावरून बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या भगवानगडावरील दसरा मेळाव्यावर आता राजकारण सुरू झाले आहे.
भगवान गडावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी राजकीय भाषण करण्यास विरोध केला होता. आता त्याच भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीने पुढाकार घेतला आहे.
पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळावाला अडसर म्हणुन हा मेळावा असल्याचे समजून अनेक वंजारी समाजातील बांधव नाराज असल्याचे समजते. जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी पुढाकार घेऊन समिती स्थापन केली. याच समितीच्या माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळावा होणार आहे.
यामुळे आता पंकजा मुंडे आणि या समितीत संघर्ष सुरू झाला. दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचे काम करू नये, अशा भावना व्यक्त करून जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. यामुळे आता हा संघर्ष आणखी पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे काय भुमीका घेतात याकडे लक्ष द्यावे लागेल आहे. ( Pankaja Munde Bhagwangad Dasara Melava )