सर्व पिकांचे पंचनामे पूर्ण करावेत; दिलीप वळसे पाटील

* पिंपरखेडमध्ये बाधितांना दिलासा
* अस्मानी संकटाने हवालदिल शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
जांबूत – पिंपरखेड (ता. शिरूर) येथे ऊस पिकासहित नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. रस्ते आणि पाणंद रस्त्यांच्या नुकसानीचा तातडीने अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या.
शुक्रवार (दि. 29) झालेल्या ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतीचे बांध आणि रस्ते वाहून गेल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली. या पार्श्वभूमीवर वळसे पाटील यांनी सोमवार (दि.1) नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
वळसे पाटील म्हणाले की, वाहून गेलेले शेतीचे बांध आणि रस्ते दुरुस्तीसाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून जेसीबी उपलब्ध करून देऊ तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून मुरूम उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पुढील काळात देखील गावातील विकासकामांना मोठा निधी उपलब्ध करून गावातील मधला मळा रस्ता देखील पूर्ण करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या ज्योती बोंबे, सोसायटीचे माजी संचालक शांताराम बोंबे यांनी शेतकऱ्यांवर कोसळलेल्या अस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला असल्याच्या व्यथा मांडल्या.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी मंचर बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब बेंडे, माजी सभापती विश्वास कोहोकडे, बाळशिराम ढोमे, दत्ता कदम, बाळासाहेब भोर, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, उपसरपंच विकास वरे, काठापूरचे सरपंच बिपीन थिटे, सोसायटीचे चेअरमन किरण ढोमे, माजी उपसरपंच रामदास ढोमे, ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, शरद बोंबे, भाऊसाहेब ढोमे, देवराम ढोमे, रामदास दरेकर, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी उपसरपंच दामोधर दाभाडे यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन नरेश ढोमे यांनी केले.





