Panama City Blast: पनामा कालव्याजवळ भीषण स्फोट ; पॅसेफिक प्रवेशद्वारापाशी तेलवाहू जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी
Panama City Blast: मध्यपूर्वेत एकीकडे आगीचा भडका उडत असताना आता दुसरीकडे अमेरिका आणि पनामा देशाला जोडणाऱ्या पनामा कालव्याजवळ भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.

Panama City Blast: मध्यपूर्वेत एकीकडे आगीचा भडका उडत असताना आता दुसरीकडे अमेरिका आणि पनामा देशाला जोडणाऱ्या पनामा कालव्याजवळ भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे.
काल पनामा सिटीमध्ये ‘ब्रिज ऑफ द अमेरिकाज’ जवळ इंधन टँकरचा स्फोट होऊन एक मोठा अपघात घडला. या स्फोटामुळे परिसरात मोठी आग लागली आणि धुराचे लोट आकाशात सर्वत्र पसरले.
अपघात कसा घडला?
समोर आलेल्या माहितीनुसार, बाल्बोआ भागातील एका तेल टाकीच्या ठिकाणी अचानक आग लागली. या आगीने जवळच्या अनेक टँकरना वेगाने वेढले आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा मोठा होता कि त्याचा आवाज दूरवर ऐकू आला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटाच्या वेळी रस्त्यावर आगीच्या ज्वाला पसरताना दिसत होत्या. पुलावरून जाणारे चालक घाबरून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले.
किती लोक प्रभावित झाले?
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, किमान दोन जण गंभीररित्या भाजले आहेत. आणखी एक व्यक्ती बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाची अनेक पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.
पूल बंद
हा पूल पनामा कालव्याजवळील एक महत्त्वाचा मार्ग असून, शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव तो तात्पुरता बंद केला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने सांगितले की, पुलाची तांत्रिक तपासणी सुरू आहे आणि तो पूर्णपणे सुरक्षित घोषित होईपर्यंत पुन्हा उघडला जाणार नाही.
WATCH: Massive explosion from a tanker near the Bridge of the Americas in Panama City, Panama pic.twitter.com/cIp7K2b0xq
— Breaking911 (@Breaking911) April 6, 2026
ब्रिज ऑफ द अमेरिकास अंदाजे १,६५४ मीटर लांब असून तो पॅसिफिक प्रवेशद्वाराला पनामा कालव्याशी जोडतो. हा देशातील सर्वात महत्त्वाच्या मार्गांपैकी एक आहे.
सध्याची परिस्थिती काय आहे?
सध्या आग नियंत्रणात आणण्याचे आणि बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. हा अपघात भीषण होता आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना त्या भागापासून दूर राहण्याचे आणि सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






