भारतीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले,”त्यांना देशातून…”

Trump Reaction।अमेरिकेत भारतीय नागरिक चंद्र नागमल्लैया यांच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आरोपींविरुद्ध ‘प्रथम श्रेणीचा खटला’ चालवण्याचे आणि आरोपींना कायद्यानुसार पूर्ण शिक्षा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी अमेरिका पुन्हा सुरक्षित करण्याचे वचन देत,”त्यांचे प्रशासन बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबद्दल मवाळ राहणार नाही” असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी बायडेन सरकारच्या धोरणांवर टीका Trump Reaction।
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर हल्लेखोराला बेकायदेशीर स्थलांतरित म्हटले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये,”बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून हाकलून लावायला हवे होते” असे म्हटले आहे. तसेच पुढे बोलताना ट्रम्प यांनीअसे न केल्याबद्दल बायडेनच्या उदारमतवादी धोरणांना दोष दिला. या दरम्यान, त्यांनी बायडेन सरकारच्या कार्यकाळात बनवलेल्या स्थलांतर धोरणावर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की आता या बेकायदेशीर स्थलांतरित गुन्हेगारांबद्दल कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
कोबोसने नागमल्लैया यांची हत्या का केली?
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे भारतातील कर्नाटक राज्यातील चंद्र नागमल्लैया यांची हत्या त्यांचे सहकारी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ (३७) यांनी केली. वॉशिंग मशीनवरून दोघांमध्ये वाद झाला. नागामल्लैय्या यांनी थेट बोलण्याऐवजी दुसऱ्या कोणाला सूचना देण्यास सांगितले तेव्हा कोबोस यांचा राग अनावर झाला आणि त्याच त्यांची हत्या त्याने केली.
१० सप्टेंबर रोजी नागामल्लैय्या यांची हत्या Trump Reaction।
१० सप्टेंबर रोजी टेक्सासमधील डलास येथील ‘डाउनटाउन सूट्स’ मोटेलमध्ये वॉशिंग मशीनवरून वाद झाला. त्यानंतर कोबोस इतके संतापले की त्यांनी नागामल्लैय्या यांचा चाकूने पाठलाग केला आणि नंतर त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर त्यांचा शिरच्छेद केला. खुनीही त्याच मोटेलमध्ये काम करत होता. गुन्हेगारी इतिहास असलेल्या कोबोस यांना पोलिसांनी अटक केली आहे.
घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल
घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले, ज्यामध्ये कोबोस चाकू काढून नागामल्लैय्यांवर हल्ला करताना दिसले. अमेरिकन इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की,कोबोस यांना यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते, परंतु क्युबाने त्यांची हद्दपारी स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली.





