Thane-Palghar News : ठाणे-पालघरमध्ये २.६९ कोटींचा पान मसाला, तंबाखू जप्त
अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत केलेल्या धाडींदरम्यान २.६९ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केला.

Thane-Palghar News – अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत केलेल्या धाडींदरम्यान २.६९ कोटी रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखू जप्त केला. या समन्वित धाडी शुक्रवारी आणि शनिवारी टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी येवई पुलाजवळ एका ट्रकची तपासणी केली आणि ८१ लाख रुपये किमतीचा पान मसाला जप्त केला.
२० लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला, ज्यामुळे या कारवाईचे एकूण मूल्य १.०१ कोटी रुपये झाले. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालघरमधील डहाणू येथील चारोटी टोल नाक्यावर टाकलेल्या धाडीत एका ट्रकमधून ४३.५० लाख रुपये किमतीची प्रतिबंधित खाद्य उत्पादने जप्त करण्यात आली आणि सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २० लाख रुपये किमतीचा ट्रकही जप्त करण्यात आला.
डहाणू येथील कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध मकोका वापर करता येईल का, याची तपासणी करण्याबाबत पोलिसांना लेखी सूचना देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
ठाण्यात एका धाडीदरम्यान ८४.२८ लाख रुपये किमतीची प्रतिबंधित उत्पादने आणि २० लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला; त्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





