प्रभात वृत्तसेवा भवानीनगर – श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर भवानीनगर परिसरात रस्ता अत्यंत खराब झाल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट उडत आहेत. या धुळीमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे व घशाचे विकार जाणवू लागले असून अनेक नागरिक आजारी पडत असल्याने तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे. भवानीनगर येथील नीरा डावा कालवा पुलाच्या खालील बाजूस संपूर्ण रस्त्यावर माती साचली असून वाहन गेल्यानंतर प्रचंड धुळीचे लोट उडत आहेत. धुळीमुळे समोरून येणारे वाहनही दिसेनासे होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक नागरिक व वाहन चालक या धुळीच्या त्रासाला सामोरे जात आहेत. या काळात अनेक नागरिकांना श्वसन व घशाचे आजार जडले असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढ्या गंभीर परिस्थिती असूनही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पालखी महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ज्या ठिकाणी धुळीचे मोठे लोट निर्माण होत आहेत, त्या ठिकाणी साधे तात्पुरते डांबरीकरणही करण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून रस्ता रखडलेला असताना तो पूर्ण का होत नाही? नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन खेळत आहे का? असा सवाल स्थानिक नागरिक व वाहन चालक उपस्थित करत आहेत. अजून किती दिवस नागरिकांना धुळीमुळे आजारांचा सामना करावा लागणार, याचा तरी शासनाने गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी होत आहे. दरम्यान, पालखी महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे किंवा किमान ज्या ठिकाणी धुळीचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तरी डांबरीकरण करावे, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.