Pakistan | China: चीनच्या वरिष्ठ जनरलला पाकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार; ‘निशान-ए-इम्तियाझ’ पुरस्काराने झाला गौरव !

Pakistan | China : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पायदळातील वरिष्ठ जनरल ली कियामिंग यांना पाकिस्तानकडून ‘निशान-ए-इम्तियाझ’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. निसान-ए-इम्तियाझ हा पाकिस्तानातील सर्वोच्च लष्करी किताब मानला जातो. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांमधील लष्करांमधील सहकार्याचे संबंध जपल्याबद्दल जनरल ली कि कियामिंग यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या हस्ते जनरल ली कियामिंग यांना निशान-ए-इम्तियाझ या पुरस्काराने गौरवण्यात आले. यासाठी आवान ए सद्र या अध्यक्षांच्या निवासस्थानी एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान शहबाज शरीफ, लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर, सेवा प्रमुख आणि संसद सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी जनरल ली कियामिंग यांना विशेष मानपत्र देण्यात आले. त्यामध्ये त्यांच्या चार दशकांच्या करिअरचा आढावा घेण्यात आला आहे. जनरल कियामिंग यांचे व्यवस्थापन कौशल्य आणि योगदान आणि धाडसी निर्णय घेण्याच्या क्षमतेचा यामध्ये विसेष उल्लेख करण्यात आला आहे.
ली कियामिंग यांनी आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पाकचे अध्यक्ष झरदारी यांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि दोन्ही देशांच्या सहकार्याच्या संबंधांचा पुन्हा आढावा घेतला. चीन हा पाकिस्तानचा विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांनी आपापसातील हे संरक्षण सहकार्याचे संबंध भविष्यात अधिक वृद्धिंगत करण्याची गरज असल्याचे झरदारी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तर चीन आणि पाकिस्तानमधील मैत्री अभेद्य आहे. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी दोन्ही देशांनी मिळून एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे, असे ली कियामिंग यांनी यावेळी बोलताना सांगितले.





