Pakistan : पाकिस्तानी नागरिकाला अवैध वास्तव्याबद्दल अटक

बंगळुरू – भारतात तब्बल १० वर्षांपासून अवैध वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकाला कर्नाटकमध्ये अटक करण्यात आली. तो त्या राज्यात मागील ६ वर्षांपासून बनावट नाव धारण करून राहत होता.
पाकिस्तानी नागरिक, त्याची बांगलादेशी पत्नी आणि इतर दोन नातलगांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. संबंधित पाकिस्तानी आधी बांगलादेशची राजधानी ढाक्यात वास्तव्याला होता. तिथे त्याने स्थानिक तरूणीशी विवाह केला.
ते दाम्पत्य २०१४ या वर्षापासून दिल्लीत राहू लागले. तिथून ते २०१८ मध्ये कर्नाटकला शिफ्ट झाले. त्या राज्याची राजधानी असणाऱ्या बंगळुरू शहराच्या हद्दीलगत भाडेपट्ट्याने घर घेऊन ते राहत होते. संबंधित घरावर छापा टाकून पोलिसांनी पाकिस्तानी नागरिकासह चौघांना पकडले.
त्यांच्याकडे विविध प्रकारची बनावट कागदपत्रे आढळली. त्याआधारे खरी ओळख दडवून बनावट नावे धारण करून ते राहत होते. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. भारतात अवैध वास्तव्य करण्यामागील त्यांचे मनसुबे जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करणार आहेत.





