भारतातील दहशतवाद विरोधी सरावात पाकिस्तान होणार सहभागी

इस्लामाबाद – भारताने आयोजित केलेल्या दहशतवादविरोधी कवायतींना उपस्थित राहण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे असे वृत्त आहे. शांघाय करारानुसार या सुरक्षा कवायती आणि सराव होणार आहे. पाकिस्तान भारतातील अशा प्रकारच्या कवायतींमध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ असेल, असे द एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने म्हटले आहे.
येत्या ऑक्टोबरमध्ये भारतात मनेसर येथे हा सराव होणार असून, पाकिस्तान शांघाय कराराचा सदस्य असल्याने आम्ही त्यात सहभागी होऊ, पाकिस्तानच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हरियाणातील मनेसर येथे होणाऱ्या या सरावात भारताव्यतिरिक्त रशिया, चीन, पाकिस्तान, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा सहभाग असेल.
भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी घटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांशी असलेले राजनैतिक संबंध कमी केले होते तसेच पाकिस्तानने भारतीय राजदूताची त्यांच्या देशातून हकालपट्टी केली होती. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने घेतलेला हा निर्णय महत्वपुर्ण मानला जात आहे.





