इराणने अणू उर्जा विकसित करण्याला पाकिस्तानचा पाठिंबा; पेझेश्कियान आणि शहबाज शरीफ यांच्यात द्विपक्षीय चर्चा
Pakistan | Iran – शांततेच्या कारणास्तव अणू उर्जा क्षमता विकसित करण्याच्या इराणच्या अधिकाराला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी काही करारांवर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेले इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी काल पाकिस्तनचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर एका संयुक्त पत्रकार परिषदेत शरीफ यांनी इराणला शांततामय मार्गाने अणू उर्जा विकसित करण्याचा अधिकार असल्याच्या मुद्दयावर भर दिला. इराणला शांततेच्या मार्गाने अणू उर्जा मिळवण्याचा अधिकार आहे, याला पाकिस्तानचा इराणला पाठिंबा आहे, असे शरीफ म्हणाले.
इराणच्या अणू उर्जाविषयक कार्यक्रमामुळेच इराण आणि इस्रायलमध्ये अलिकडच्या काळात तीव्र संघर्ष उत्पन्न झाला होता. इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढलेला असताना शरीफ यांनी ही टिप्पणी केली आहे.
अमेरिकेने पाकिस्तानला इराणच्या अणू उर्जा कार्यक्रमाबाबत नाटो बाहेरील सहकारी मानले आहे. जून महिन्यात इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणच्या अणू उर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ले केले होते. त्यानंतर इराणने आंतरराष्ट्रीय अणू उर्जा संस्थेला सहकार्य देण्याचे थांबवले आहे.
शरीफ यांनी इस्रायलने इराणबाबत दाखवलेल्या आक्रमकतेवरही टीका केली आणि इराणच्या आत्मरक्षणाप्रती एकता देखील व्यक्त केली. इस्रायलकडून गाझामध्ये केल्या जात असलेल्या हल्ल्यांवरही त्यांनी टीका केली. जागतिक समुदायाने, प्रामुख्याने मुस्लिम देशांनी गाझामध्ये होत असलेल्या मानवी अधिकारांच्या उल्लंघनाकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
इराण आणि पाकिस्तान दरम्यान काही सामंजस्य करार करण्यात आले असून या सामंजस्य करारांच्या आधारे लवकरच करार केले जातील, अशी आशाही शरीफ यांनी व्यक्त केली. दोन्ही देशांमधील व्यापार लवकरच १० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी ठेवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी दहशतवादाच्या मुद्दयावरही चर्चा केली. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमाभागातील दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचेही त्यांनी मान्य केले.
१२ करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या…
इराण आणि पाकिस्तान दरम्यान मुक्त व्यापार करार लवकरात लवकर निश्चित करण्याबाबतचा सामंजस्य करारही केला गेला असल्याचे पेझेश्कियान यांनी सांगितले.
दोन्ही देशांमध्ये १२ करार आणि सामंजस्य करार करण्यात आले असल्याचे पाकिस्तानच्या सरकारी रेडिओने म्हटले आहे. या करारांमध्ये व्यापार, शेती, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, माहिती आणि संप्रेषण, संस्कृती, कला, पर्यटन, हवामान आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे.





