Pakistan Squad Announce : टी-२० वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर; सर्वात मोठ्या ‘मॅचविनर’ला केलं बाहेर!

Pakistan Squad Announce for T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आपली २० खेळाडूंची प्राथमिक यादी आयसीसीकडे (ICC) सोपवली आहे. या संघातून अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज आणि माजी कर्णधार मोहम्मद रिझवान याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून, हा पाकिस्तान क्रिकेटमधील मोठा निर्णय मानला जात आहे.
मोहम्मद रिझवान बाद, उस्मान खानवर जबाबदारी –
न्यूज रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी संघात मोठे फेरबदल करण्याचे संकेत दिले आहेत. हेसन यांच्या मते, उस्मान खान हा यष्टीरक्षक म्हणून अधिक चांगला पर्याय ठरू शकतो, त्यामुळेच रिझवानला संघात स्थान मिळालेले नाही.
प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन आणि दुखापतींचे सावट –
बाबर आझम, शाहीन शाह आफ्रिदी आणि शादाब खान यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा २० सदस्यीय संघात समावेश आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या गुडघ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे, परंतु तो पुढील दोन आठवड्यांत तंदुरुस्त होईल, अशी आशा निवड समितीला आहे. निवड समितीमध्ये आकिब जावेद, आमीन डार आणि असद यांचा समावेश असून, यावेळी कोणताही ‘चीफ सिलेक्टर’ नेमण्यात आलेला नाही.
पाच फिरकीपटूंना संधी –
पाकिस्तानने श्रीलंकेतील खेळपट्ट्यांचा अंदाज घेत आपल्या संघात तब्बल ५ फिरकीपटूंना स्थान दिले आहे. यात शादाब खान, मोहम्मद नवाज, अबरार अहमद, उस्मान तारिक आणि माज सदाकत यांचा समावेश आहे. मात्र, सुफियान मुकीम आणि वेगवान गोलंदाज अहमद दानियाल यांना संघात स्थान मिळालेले नाही.
हेही वाचा – India Bangladesh Tensions : बांगलादेशचा टी-२० वर्ल्ड कपसाठी भारत दौऱ्यावर बहिष्कार! BCB ने घेतला मोठा निर्णय
महत्त्वाचे वेळापत्रक आणि नियम:
- संघ निश्चिती: सध्या २० खेळाडूंची यादी दिली असली तरी, मुख्य प्रशिक्षक माइक हेसन लवकरच अंतिम १५ खेळाडूंची निवड करतील.
- बदलाची मुदत: आयसीसीच्या नियमानुसार, सर्व २० देश ३१ जानेवारीपर्यंत आपल्या संघात बदल करू शकतात.
- स्पर्धेचा कालावधी: टी-२० वर्ल्ड कप ७ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अंतिम सामना ८ मार्च रोजी खेळवला जाईल.
- स्थळ: विशेष म्हणजे, बांगलादेशने भारतात खेळण्यास नकार दिल्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे.





