India Bangladesh Tensions about Cricket : भारत आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून, याचे रूपांतर आता कूटनैतिक संघर्षात झाले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने अधिकृतपणे मागणी केली आहे की, पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमधील बांगलादेशचे सर्व साखळी सामने भारताऐवजी श्रीलंकेत आयोजित करावेत. बांगलादेशचा खेळाडू मुस्तफिजुर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्याने बांगलादेशने ही आक्रमक भूमिका घेतली आहे. सन्मानाशी तडजोड नाही’ : आसिफ नजरूल बांगलादेश सरकारचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ नजरूल यांनी या मुद्द्यावर अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. रविवारी ‘बीएसएस’ (BSS) वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशी क्रिकेट, आमचे खेळाडू आणि देशाचा अपमान सहन करणार नाही. गुलामगिरीचे दिवस आता संपले आहेत.” नजरूल यांनी पुढे जोर देऊन सांगितले की, बांगलादेश आता स्वतःच्या अटींवर पुढे जाईल आणि कोणताही बाह्य दबाव किंवा अपमानास्पद वागणूक स्वीकारली जाणार नाही. फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाले? बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) पुढील पावले उचलण्यासाठी आपत्कालीन बैठक बोलावली. बैठकीनंतर, नझरुलने फेसबुक पोस्टमध्ये घोषणा केली की बीसीबीने भारतात होणाऱ्या टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याचा निर्णय मागे घेतला आहे. नझरुल यांनी लिहिले की, “बांगलादेश विश्वचषकात खेळण्यासाठी भारतात येणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज हा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आक्रमक जातीय धोरणांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.” हेही वाचा – RCB Players Injured : IPL 2026 पूर्वी RCB ला मोठा धक्का! कर्णधारासह ४ स्टार खेळाडू जखमी; संघाची चिंता वाढली वादाचे नेमके मूळ काय? बीसीसीआयच्या (BCCI) सूचनेनुसार, बांगलादेशचा स्टार गोलंदाज मुस्तफिजुर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर बांगलादेश सरकार आणि क्रिकेट बोर्डाने याकडे आपल्या खेळाडूंचा अपमान म्हणून पाहिले आहे. जर त्यांच्या खेळाडूंना लीग क्रिकेटमध्ये योग्य सन्मान आणि सुरक्षा मिळत नसेल, तर विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेसाठी ते भारतात सुरक्षित कसे राहतील? असा सवाल बांगलादेश सरकारने उपस्थित केला आहे. हेही वाचा – Shashi Tharoor : मुस्तफिजुरच्या हकालपट्टीवरून शशी थरूर संतापले! “जर तो दुसऱ्या धर्माचा असता तर…”; BCCI ला विचारला थेट सवाल आयसीसीकडे मांडणार प्रस्ताव – क्रीडा सल्लागारांच्या सूचनेनंतर, बांगलादेश क्रिकेट बोर्ड आता हे प्रकरण अधिकृतपणे आयसीसी (ICC) कडे नेण्याच्या तयारीत आहे. सुरक्षा आणि सन्मानाचे कारण देऊन बांगलादेशचे सामने श्रीलंकेत हलवण्यात यावेत, अशी मागणी ते करणार आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, हे विधान केवळ क्रिकेटपुरते मर्यादित नसून, बांगलादेशातील अलिकडच्या सत्तांतरानंतर भारतासोबत बदलत असलेल्या संबंधांचा हा परिणाम आहे. भारताने सुरक्षा कारणास्तव खेळाडूला रिलीज करण्यास सांगितले असताना, बांगलादेशने याला राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनवला आहे.