operation sindoor : भारताने उध्वस्त केलेल्या तळांची पाकिस्तानकडून पुन्हा उभारणी; दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडसाठी सरकारनेच दिला निधी

Pahalgam attack – ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने उद्ध्वस्त केलेले दहशतवादी लाँचपॅड अर्थात दहशतवाद्यांचे तळ उभारणीचे काम पाकिस्तानने पुन्हा सुरू केल्याचे दिसते आहे. पाकिस्तानचे सैन्य, गुप्तचर संस्था आयएसआय आणि सरकारनेही या नव्या बांधणीला पाठिंबा दिला आहे.
पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि त्याच्या आसपासच्या भागात दहशतवादी लाँचपॅड पुन्हा बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातील एका प्रख्यात इंग्रजी वाहिनीने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की यासाठी कंत्राटे देखील देण्यात आली आहेत. यावरून स्पष्ट होते की पाकिस्तान त्यांनी पोसलेल्या दहशतवादाला पुन्हा जिवंत करण्यात गुंतलेला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभव झाल्यानंतरही फील्ड मार्शल बनलेल्या असीम मुनीर यांनी स्वतः हस्तक्षेप करून या दहशतवादी अड्ड्यांच्या पुन्हा बांधण्यासाठी सरकारी निधी जाहीर केला आहे. मुनीर यांनी आतापर्यंत यासाठी ४० कोटी रुपयांची निधी व्यवस्था केली आहे. त्याच वेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी असेही म्हटले आहे की सरकार भारतीय हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली घरे आणि मशिदी पुन्हा बांधेल.
बहावलपूरला १४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. भारतीय लष्कराने येथील मरकझ सुभान अल्लाह कॉम्प्लेक्सवर क्षेपणास्त्रे डागली होती, ज्यात जैश-ए-मोहम्मदच्या तळाला लक्ष्य केले होते. हा दहशतवादी मसूद अझहरचा बालेकिल्ला मानला जातो आणि येथे १३ दहशतवादी मारले गेले होते.
मुरीदकेला १५ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. हा लष्कर-ए-तोयबाचा बालेकिल्ला आहे. या कॉम्प्लेक्सला भारताने लक्ष्य केले होते आणि हल्ल्यात इमारती मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाल्या होत्या. मुझफ्फराबादला ११ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
येथे दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता आणि तोही भारताने मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त केला होता. निधी मिळाल्यानंतर येथे बांधकाम सुरू झाले आहे. पाकिस्तानी लष्कराने येथे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना मदत केली होती.
कंत्राटदारांना ११ दिवसांचा वेळ
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी कंत्राटदारांना लष्कर आणि जैशच्या दहशतवादी अड्ड्या दुरुस्त करण्यासाठी अंतिम मुदतही दिली आहे. कंत्राटदारांना बांधकाम पूर्ण करण्यासाठी ३० जून ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मुनीर यांनी त्यांची दुरुस्ती करण्यासाठी एक टीम देखील तयार केली आहे आणि ते स्वतः या कामांवर लक्ष ठेवत आहेत.
पाकिस्तान दहशतवादाला किती प्रमाणात पाठिंबा देतो याचे पुरावेही समोर आले. मुरीदके येथे भारताने केलेल्या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले. जखमी दहशतवाद्यांना भेटण्यासाठी पाकिस्तानचे दोन मंत्री तेथे पोहोचले होते.





