पाकिस्तानात लष्कराच्या विरोधात जनतेचा आक्रोश

इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन्स (ISPR) डीजी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी रावळपिंडी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘बेकायदेशीर राजकीय माफिया मोठ्या प्रमाणावर उदयास आले आहेत आणि ते त्यांच्या निहित स्वार्थांमुळे मोहिमेला पुढे जाऊ देऊ इच्छित नाहीत. इमरान खान यांच्या समर्थकांकडे बोट दाखवत लष्कराने हे आरोप केले आहेत. चीनला खूश करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेचा पाकिस्तानमधील लोक निषेध करत आहेत. यामुळे लष्कर चिंतेत आहे.
डीजी लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ पुढे म्हणाले, ‘आझम-ए-इस्तिकम ही केवळ लष्करी कारवाई नाही तर ती दहशतवादविरोधी कारवाई आहे, ज्याला राष्ट्रीय कृती योजनेचे नवीन स्वरूप म्हणता येईल. या ऑपरेशनचा उद्देश दहशतवाद संपवणे हा आहे जेणेकरून देशाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारेल. डीजी आयएसपीआर म्हणाले की, एक अतिशय मजबूत राजकीय लॉबी या ऑपरेशनच्या विरोधात उभी राहिली आहे आणि ही राजकीय लॉबी उद्ध्वस्त करू इच्छित आहे. राष्ट्रीय कृती योजना यशस्वी होऊ नये, असेही या गटाला वाटत आहे.
ही योजना मोडकळीस आणण्यासाठीही मोठा पैसा खर्च होत असल्याचे ते म्हणाले. शरीफ म्हणाले, सर्वप्रथम या राजकीय माफियांनी ऑपरेशनबाबत खोटे पसरवून वादग्रस्त बनवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत धार्मिक संघटनांची नोंदणी करावी लागेल. आतापर्यंत 32 हजार संस्थांपैकी केवळ 16 हजार संस्थांची नोंदणी झाली आहे. याला लष्कर जबाबदार आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.भारतात बेकायदेशीर अर्थव्यवस्था सुरू आहे ज्याद्वारे दहशतवाद आणि गुन्हेगारी नेटवर्कला निधी मिळतो. राष्ट्रीय कृती आराखड्याची योग्य अंमलबजावणी करणे हाच एकमेव उपाय आहे.’
दरम्यान. लष्कराने अशा प्रकारे उघडपणे बोलणे हा पाकिस्तानच्या राजकारणात मोठा मुद्दा बनू शकतो. यापूर्वीही पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराने ढवळाढवळ केली आहे आणि त्यामुळे सरकारेही वादात सापडली आहेत.
यापूर्वीही पाकिस्तानमध्ये दहशतवादाविरोधात ‘जर्ब-ए-अज्ब’ आणि रद्द-उल-फसाद सारख्या मोहिमा सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक वेळा विस्थापन मोठ्या प्रमाणावर झाले. विस्थापनाबद्दल लष्कराला प्रश्न विचारला असता, डीजी आयएसपीआर म्हणाले, ही केवळ लष्करी कारवाई नाही तर आर्थिक विकास आणि स्थैर्याला चालना देण्याच्या उद्देशाने दहशतवादविरोधी ऑपरेशन आहे. नागरिकांवरील हल्ल्यानंतर चीनला खूश करण्यासाठी पाकिस्तानने ही मोहीम सुरू केली होती. याशिवाय आर्थिक मदत मिळवण्यासाठी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याचे दाखवायचे आहे.





