Islamabad Blast: पाकिस्तानात शुक्रवारच्या नमाजानंतर भीषण स्फोट, 31 जणांचा मृत्यू, 169 जखमी
Islamabad Blast:

Islamabad Blast: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद शुक्रवारी दुपारी भीषण बॉम्बस्फोटाने हादरली. तरलाई भागातील एका इमामवाड्यामध्ये जुमेच्या नमाजदरम्यान झालेल्या या स्फोटात 31 जणांचा मृत्यू आणि 169 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नमाजसाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली असताना हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की परिसरातील इमारतींना हादरे बसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून ‘रेस्क्यू ११२२’ च्या पथकांकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित –
जखमींवर तातडीने उपचार करण्यासाठी इस्लामाबादमधील प्रमुख रुग्णालयांमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) येथे आणीबाणी घोषित करण्यात आली असून मुख्य इमर्जन्सी, ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग सक्रिय करण्यात आले आहेत. पॉलीक्लिनिक आणि CDA रुग्णालय या रुग्णालयांमध्येही जखमींना दाखल करण्यात आले असून डॉक्टरांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तपासाचे चक्र फिरले –
इस्लामाबाद पोलीस प्रवक्ते तकी जवाद यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघाती हल्ला होता की आयईडी (IED) स्फोट, याचा तपास फॉरेन्सिक टीम करत आहे. अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
“हा हल्ला म्हणजे भेकड कृत्य आहे. अशा दहशतवादी हल्ल्यांमुळे देशाचे मनोधैर्य खचणार नाही. शांतता आणि स्थिरतेसाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.” — तारिक फजल चौधरी, संसदीय कार्यमंत्री (पाकिस्तान)
तीन महिन्यांतील दुसरी मोठी घटना –
पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी इस्लामाबादच्या G-11 भागातील जिल्हा न्यायालबाहेर आत्मघाती हल्ला झाला होता, ज्यामध्ये १२ जणांचा बळी गेला होता. त्या घटनेनंतर तीन महिन्यांच्या आतच पुन्हा एकदा राजधानीत हा मोठा रक्तपात झाला आहे.





