पत्रकारांसाठी पाकिस्तान अजूनही सर्वात धोकादायक देश

इस्लामाबाद – पाकिस्तान अजूनही जगभरातील पत्रकारांसाठी सर्वांत धोकादायक देश आहे. 2000 सालापासून पाकिस्तानमध्ये 140 पत्रकारांची हत्या झाली आहे. “फ्रिडम नेटवर्क’च्या अहवालामध्ये ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.
या वर्षात पाकिस्तानमध्ये पत्रकारांवर सुरू असलेल्या खटल्यांच्या आकडेवारीची माहिती पाहिली तर स्वतंत्र आणि निःपक्ष प्रसारमाध्यमांचे पाकिस्तानातील भविष्य चिंताजनक आहे, असे म्हणावे लागते. असे मत पाकिस्तानातील एका आघाडीच्या दैनिकामध्ये मानवी हक्क विषयक कार्यकर्ते आणि पत्रकार आय.ए. रेहमान यांनी व्यक्त केले आहे.
पाकिस्तानमधील मुद्रित माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या पत्रकारांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांपेक्षा दुपटीने अधिक कायदेशीर कारवाई केली जात असते. पाकिस्तानमधील अन्य प्रांतांपेक्षा सिंध प्रांतात कार्यरत असलेल्या पत्रकारांचे काम जास्त धोकादायक बनले आहे.
एकतृतीयांश पत्रकारांवर पिनल कोड अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. तर उर्वरित एकतृतीयांश पत्रकारांवर दहशतवादाला सहाय्य केल्याचे आरोप आहेत. उर्वरित पत्रकारांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संबंधित गुन्हे आणि बदनामीचे खटले दाखल आहेत.
बहुतेक पत्रकारांवर देशाविरोधातील कारवाया आणि सरकारी यंत्रणांची बदनामी करण्याचे आरोप सर्रास होत असतात. याशिवाय बेकायदेशीरपणे शस्त्रे आणि स्फोटके बाळगणे, अंमलीपदार्थांची तस्करी, धोकादायक साहित्य बाळगणे आणि नागरिकांना त्रास देण्याचे आरोप होत असतात.
पत्रकारांवरील एकूण आरोपांपैकी निम्म्या प्रकरणांमध्येच खटले चालवले जातात. 60 टक्के प्रकरणांचे खटले पूर्णही होत नाहीत. त्यामुळे बहुतेक पत्रकारांना आपले निरपराधीत्व सिद्धच करता येत नाही. त्यामुळे अनेक पत्रकारांना न्याय मिळत नाही. गेल्या वर्षी 33 पत्रकारांच्या हत्येचा तपासच होऊ शकला नाही, असेही रेहमान यांनी म्हटले आहे.





