प्रभावी मुस्लिम देशांकडून पाकिस्तानला कानपिचक्‍या

भारताबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना
इस्लामाबाद: भारताबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी काही प्रभावी मुस्लिम देशांनी पाकिस्तानला कानपिचक्‍या दिल्या आहेत. एवढेच नव्हे तर, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत:च्या बोलण्याला आवर घालावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

काश्‍मीरवरून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. अशातच इम्रान यांच्यासह पाकिस्तानी उच्चपदस्थांकडून सातत्याने भारतविरोधी गरळ ओकली जात आहे. त्यामुळे तणाव निवळण्याची शक्‍यता आणखीच धूसर बनत आहे. त्यापार्श्‍वभूमीवर, पाकिस्तानला समज देण्यासाठी प्रभावी मुस्लिम देश पुढे सरसावले आहेत. अलिकडेच संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आणि सौदी अरेबियाच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचा संयुक्त दौरा केला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानला सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. भारताबरोबर मागील दाराने राजनैतिक स्वरूपाची चर्चा करावी, असेही त्यांनी सुचवले. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव निवळावा यासाठी प्रयत्न करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

भारताने जम्मू-काश्‍मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान बिथरला. त्यातून पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे भारतविरोधी गाऱ्हाणी मांडण्याचे सत्र आरंभले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून त्या देशाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्या देशाची संपूर्ण भिस्त मुस्लिम देशांवर आहे. मात्र, ते देशही पाकिस्तानच्या पाठिशी उभे राहण्याची टाळाटाळ करत असल्याचेच स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.