पाकिस्तान सरकार दोन महिन्यात पडेल; इम्रान खान यांचे भाकित

इस्लामाबाद – पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांचे सरकार दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. अदियाला तुरुंगात झालेल्या सुनावणीच्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. तुरुंगात राहूनच आपण या सरकारबद्दल भविष्य वर्तवू शकतो. हे सरकार दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ राहू शकणार नाही. मात्र हे सरकार कसे आणि केंव्हा पडेल याबद्दल मात्र त्यांनी काहीही सांगितले नाही.
सध्याच्या सरकारच्या देखरेखीखाली जर निवडणुका झाल्या तर आपला पक्ष या निवडणुका स्वीकारणार नाही, असेही इम्रान खान म्हणाले. या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीनंतर शहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग- नवाज गटाच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. मात्र इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने निवडणुकीचा हा निकाल कधीच मान्य केला नाही. हे सरकारच बनावट आहे आणि या सरकारने जनादेश चोरला आहे, असे इम्रान खान नेहमीच म्हणत राहिले आहेत.
दिनांक ९ मे रोजीच्या दंगलीविषयी सशर्त माफी मागण्याच्या वक्तव्याबद्दलही त्यांनी स्पष्टिकरण दिले. आपण बिनशर्त माफी मागितली असल्याचा चुकीचा प्रवाद निर्माण केला गेला आहे. जर दंगलींमध्ये पीटीआयचे कार्यकर्ते सहभागी असल्याचे आढळले तरच आपण माफी मागायला तयार असल्याचे इम्रान खान म्हणाले.





