DRS Controversy : बांगलादेशच्या विजयानंतर अन् पाकची रडारड; शेवटच्या ओव्हरमधील ‘त्या’ DRS मुळे वाद पेटला, मॅच रेफरीकडे तक्रार
DRS Controversy : सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने थेट सामनाधिकाऱ्यांची भेट घेऊन मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयाविरोधात तक्रार नोंदवली आहे.

DRS Controversy PAK vs BAN ODI : ढाका येथील शेर-ए-बांग्ला नॅशनल स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला धूळ चारली. मात्र, या विजयापेक्षा पाकिस्तानने पंचांच्या निर्णयावर घेतलेला आक्षेप सध्या जास्त चर्चेत आहे. सामना संपल्यानंतर पाकिस्तान संघ व्यवस्थापनाने थेट सामनाधिकाऱ्यांची भेट घेऊन मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांच्या निर्णयाविरोधात तक्रार नोंदवली आहे.
शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?
पाकिस्ताला विजयासाठी शेवटच्या २ चेंडूंवर १२ धावांची गरज होती. रिशाद हुसेनने पाचवा चेंडू लेग साईडच्या बाहेर टाकला, जो मैदानावरील पंचांनी ‘वाईड’ घोषित केला. मात्र, काही क्षणांनंतर बांगलादेशने एलबीडब्ल्यूसाठी (LBW) रिव्ह्यू घेतला. पाकिस्तानचा आक्षेप असा आहे की, स्टेडियममधील मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवल्यानंतर आणि ठराविक १५ सेकंदांची वेळ उलटून गेल्यानंतर बांगलादेशला रिव्ह्यू घेण्याची परवानगी देण्यात आली.
नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा –
आयसीसीच्या नियमांनुसार, मोठ्या स्क्रीनवर रिप्ले येण्यापूर्वीच रिव्ह्यू घेणे बंधनकारक असते. पाकिस्तानचे म्हणणे आहे की, बांगलादेशच्या खेळाडूंनी स्क्रीनवर चेंडू बॅटला लागल्याचे पाहिल्यावरच पंचांकडे धाव घेतली. थर्ड अंपायरने रिप्ले पाहून शाहीन आफ्रिदीला बाद ठरवले, ज्यामुळे पाकिस्तानला ‘वाईड’ चेंडूऐवजी एक विकेट गमवावी लागली. कर्णधार शाहीन आफ्रिदीने मैदानातच या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
पाकिस्तानची सामनाधिकाऱ्यांकडे धाव –
‘ईएसपीएन क्रिकइन्फो’च्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघाने हा मुद्दा गांभीर्याने घेत सामनाधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे. रिव्ह्यू घेण्याची १५ सेकंदांची वेळ संपली असतानाही बांगलादेशला ही संधी का दिली गेली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बांगलादेशने ही मालिका जिंकली असली, तरी या तांत्रिक वादामुळे पाकिस्तानच्या पराभवाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.





