Pakistan Boycott : क्रिकेट विश्वात भूकंप! पाकिस्तानचा भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार; वर्ल्ड कपमधील महामुकाबल्यावर टाकला बहिष्कार
Pakistan Boycott : पाकिस्तान सरकाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Pakistan boycott India match T20 World Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप २०२६ सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान सरकारने एक अत्यंत धक्कादायक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत सहभागी होईल, मात्र १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणारा भारताविरुद्धचा हाय-व्होल्टेज सामना खेळणार नाही, असे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. राजकीय तणाव आणि अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे आयसीसी आणि क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तान सरकारचा अधिकृत पवित्रा –
पाकिस्तान सरकारने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर स्पष्ट केले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सरकारने राष्ट्रीय क्रिकेट संघाला आयसीसी वर्ल्ड टी-२० २०२६ मध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. परंतु, पाकिस्तानचा संघ १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारताविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरणार नाही.”
टीम इंडियाला न खेळता मिळणार २ गुण –
पाकिस्तानचा भारताविरुद्धच्या टी२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार
पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकल्यामुळे हा सामना ‘फॉरफिट’ (Forfeit) मानला जाईल. नियमांनुसार, पाकिस्तानने खेळण्यास नकार दिल्यामुळे भारतीय संघाला कोणताही चेंडू न खेळता थेट २ गुण दिले जातील. यामुळे ग्रुप स्टेजमध्ये भारताची स्थिती मजबूत होईल, तर पाकिस्तानला २ गुणांचे नुकसान सहन करावे लागेल.
#ICCT20WORLDCUP | Pakistan will not play the match against India on February 15th, tweets Government of Pakistan pic.twitter.com/4dUN9Xi1EE
— ANI (@ANI) February 1, 2026
नकार फक्त एका सामन्याला, स्पर्धेला नाही!
न्यूट्रल वेन्यू: राजकीय कारणांमुळे पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिल्याने आयसीसीने त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत (न्यूट्रल वेन्यू) हलवले होते. यानंतर
बहिष्कार: पाकिस्तानने संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याऐवजी केवळ भारताविरुद्धच्या एका सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा मार्ग निवडला आहे.
बांगलादेशचा संदर्भ: सुरक्षा कारणास्तव भारताचा दौरा नाकारणाऱ्या बांगलादेशला आयसीसीने स्पर्धेतून बाहेर केल्यानंतर, पाकिस्ताननेही स्पर्धेतून हटण्याची धमकी दिली होती. मात्र, आता त्यांनी केवळ भारतासोबतचा सामना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसीला बसणार मोठा आर्थिक फटका –
भारत-पाकिस्तान सामना हा जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक कमाई करून देणारा सामना असतो. या एका सामन्यावर कोट्यवधी रुपयांचे जाहिरात शुल्क आणि प्रेक्षकसंख्या अवलंबून असते. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे आयसीसीसह प्रायोजकांचेही मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.





